Breaking News

आंब्यांचे सामाजिक संस्थांना वाटप


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विविध प्रकारच्या 3100 आंब्याचा नैवद्य दाखवण्यात आला. अर्पण केलेले आंबे आज नगर शहरातील विविध सामाजिक संस्थांना वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडीत खरपुडे, सचिव अशोक कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, रामकृष्ण राऊत, पांडुरंग नन्नवरे, बाबासाहेब सुडके, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.दिलीप धनेश्‍वर, गणेश राऊत, ऋषीकेश आगरकर, युवराज गुंड आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, “अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री विशाल गणेशास 3100 आंब्यांचा नैवद्य अर्पण करण्यात आला होता. त्या आंब्यांचे सामाजिक संस्थांना वाटप करुन सामाजिक दायित्व जपले आहे. यापुढेही असेच उपक्रम देवस्थानच्या वतीने राबविण्यात येतील’’, असे सांगितले.

यावेळी अनामप्रेम, महात्मा विद्यार्थी वसतिगृह, केअरिंग फ्रेंड संस्था, राष्ट्रसंत आचार्य अपंग कल्याण संस्था आदी सामाजिक संस्थांना आंबे वाटप करण्यात आले. तसेच मंदिरात आलेल्या भाविकांनाही हा आंब्यांचा प्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.