Breaking News

राजीव गांधी यांच्यावरील मोदींचे आरोप बिनबुडाचे

Image result for अ‍ॅडमिरल राव
 
निवृत्त अ‍ॅडमिरल राव यांचे मत; मोदींमुळे नौदलाची बदनामी होत असल्याची खंत
मुंबई / प्रतिनिधीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आणि नौदलाची बदनामी करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया निवृत्त अ‍ॅडमिरल आय सी राव यांनी व्यक्त केली. मोदी यांनी राजीव गांधी आणि परिवाराने आयएनएस विराट युद्ध नौकेचा मनोरंजनासाठी टॅक्सीसारखा वापर केला, या आरोपांबाबत राव यांनी खंत व्यक्त केली.
संरक्षण आणि नौदलाच्या प्रोटोकॉलनुसार कुठल्याही पंतप्रधानांच्या औपचारिक दौर्‍यावर युद्ध नौका किंवा हेलिकॉप्टर वापर करण्यात काही गैर नाही, असे राव यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गरजेचे असते. कारण खासगी हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊसवर माहिती लिक होण्याची किंवा बगिंग होण्याची भीती असते, असे राव यांनी सांगितले. मोदी यांनी केलेले आरोप नवे नाहीत, यापूर्वीही असे आरोप झाले आहेत आणि यासंदर्भात नौदलाने खुलासे केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. कमांडिंग नेव्हल ऑफिसर कॅप्टन पासरिचा यांनी सदर्न नेव्हल कमांडच्या प्रमुखांना पत्र लिहून या आरोपांचे खंडन केले आहे.
लक्षद्वीप दौर्‍यावर राजीव गांधी असताना कुठलीही पार्टी झाली नव्हती, कोणीही परदेशी पाहुणे नव्हते. सोनिया गांधी आणि राहुल गांधींव्यतिरिक्त कोणीही ऑन बोर्ड नव्हते, असेही राव म्हणाले. राजकारणासाठी संरक्षण खात्याच्या नावाचा वापर होणे चुकीचे आणि निंदनीय आहे. पंतप्रधानांसारख्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने त्याची काळजी घेतली पाहिजे, असेही राव म्हणाले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी केला होता, असा खळबळजनक आरोप मोदी यांनी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील सभेत केला होता. राजीव गांधी आपल्या सासरच्या मंडळींसोबत आयएनएस विराट या युद्धनौकेवरून सुट्टीवर गेले होते. दहा दिवस सर्व जण एका बेटावर राहिले. तिथे युद्धनौकेवरील कर्मचारीवर्ग त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. हा देशाच्या सुरक्षेसोबत खेळ नाही का, असा सवाल मोदी यांनी केला होता.