Breaking News

नेवाशातील बेपत्ता मुलाचा ४८ तासांत शोध


नेवासे/प्रतिनिधी: नेवासे फाटा येथून बेपत्ता झालेल्या पंधरा वर्षीय मुलाचा नेवासा पोलिसांनी ४८ तासांत शोध लावत त्याला घरच्यांच्या हाती सोपवले. चौकशीअंती होस्टेलमध्ये रहायचे नसल्याने यापासून सुटका करून घेण्यासाठी हा मुलगा पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत माहिती अशी : नेवासे फाटा येथील इरिगेशन कॉलनीत रहात असलेल्या १५ वर्षीय विवेक महेश जाधव हा विद्यार्थी इयत्ता दहावीचे शाळेचे जादा तासिकेसाठी गेला होता. क्लास सुटल्यानंतर तो घरी आलाच नाही. विवेक बेपत्ता झाला असल्याची खबर त्याची आई सविता जाधव यांनी नेवासे पोलिस ठाण्यात दिली होती. याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मित्रांकडे तसेच नातेवाईकांकडे विचारपूस करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यंत्रणा कार्यरत केली . वृत्तपत्रात फोटो दिल्यानंतर विवेक हा मुंबई येथे असल्याचा फोन मुंबई पोलिसांकडून आला.आणि विवेकला पोलिसांनी घरच्यांच्या स्वाधीन केले. तेव्हा विवेकने होस्टेलमध्ये रहायचे नसल्याने यापासून सुटका करून घेण्यासाठी पळून गेल्याचे सांगितले.