Breaking News

पुण्यातील बेपत्ता तरुणाचा जामखेडमध्ये खून


जामखेड/प्रतिनिधी: पुणे परिसरातून मागिल सतरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तेजस भिसे या तरुणाचा जामखेडमध्ये खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आर्थिक कारणातून मित्रानेच हत्या केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जामखेड तालुक्यातील रहिवासी असून दत्ता बिरंगळ व समाधान भोगल अशी आरोपींची नावे आहेत. मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतर दोघा आरोपींविरोधात पुणे येथील वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी: दि २० एप्रिल रोजी मयत तेजस सुनिल भिसे ( वय २८ रा.रहाटणी छत्रपती चौक, पुणे) याने मित्र दत्तात्रय नवनाथ बिरंगळ (वय ३०,हल्ली रा. पुणे) मुळ रा सोनेगाव, ता.जामखेड, याच्या सोबत धुळे - अमरावतीला कार नं एम एच १२ एन एल ००९८ ने चाललो आहे असा मॅसेेज आपला मावसभाऊ निलेश मोरे यांच्या फोनवर केला होता. मात्र मयत तेजस संध्याकाळी घरी न परतल्याने २१ एप्रिल रोजी तेजसचा भाऊ प्रविण भीसे याने पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनला तेजस हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बेपत्ता तेजसचा शोध घेण्यासाठी सुरवात केली.तेजसच्या बेपत्ता होण्यामागे त्याचे मित्र दत्ता बिरंगळ व समाधान भोगल या दोघांचा सहभाग असु शकतो तसे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागताच वाकड पोलिसांनी बेपत्ता तेजसच्या अपहरणप्रकरणी ५ मे रोजी बिरंगळ व भोगल या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

पोलिस कोठडीत आरोपींना वाकड पोलिसांनी आपला पोलिस खाक्या दाखवताच दोघा आरोपींनी तेजसच्या खुनाची कबूली दिली. मयत तेजस भिसे हा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने आपला मित्र दत्ता बिरंगळ यास चिखली येथे फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले होते. मात्र मयत तेजस भिसे यास बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैशाची गरज आसल्याने तो आरोपीकडे उसने दिलेल्या पैशांची सतत मागणी करत होता.तेंव्हा आरोपींनी मयत तेजसला तुला जामखेड येथे पैसे देतो असे म्हणून कारने २० एप्रिल रोजी जामखेडकडे निघाले होते. दरम्यान प्रवास करत असतानाच आरोपी दत्ता बिरंगळ व समाधान भोगल यांनी तेजसचा गाडीतच गळा आवळून खून केला होता.खुन केल्यानंतर आरोपींनी तेजसचा मृतदेह जामखेड जवळील सौताडा घाटातील दगडाखाली टाकला व कपडे खर्डा रोडवरील राजुरी शिवारात लपवले होते. तेजसच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी पुण्याला परतले होते.यावेळी आरोपींनी वापरलेली कार काळेवाडी येथे सोडून आरोपी फरार झाले होते.