Breaking News

जिल्हा बँकेच्या मसूर शाखाधिकार्‍यांची बदली करा


मसूर / वार्ताहर : कवठे ता. कराड येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी समाधान साळुंखे यांच्या मनमानी व आर्थिक घोटाळ्याच्या प्रकाराला जनता अक्षरशः वैतागली असून येत्या काही दिवसांमध्ये जर या शाखाधिकार्‍याची बदली झाली नाही तर गांधीगिरी पद्धतीचे आंदोलन छेडू, असा इशारा कवठे येथील संतप्त ग्राहकांनी दिला आहे.

याबाबत स्थानिकांनी बोलताना सांगितले की, येथील शाखाधिकारी साळुंखे हे अतिशय मनमानी कारभार करत आहेत. लोकांना वेठीस धरतात, महिलांना अर्वाच्य बोलतात, बँक पासबुक भरून देत नाहीत, लाईट बिल भरण्यास ग्राहक आले असता सर्वर डाऊनचे नेहमीचेच उत्तर देतात. नेहमीच सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवतात, वयोवृद्ध ग्राहकांना रक्कम काढण्यास आल्यावर मुद्दाम 10-20 रु. च्या नोटा देतात, जेणेकरून पैसे मोजता येऊ नये जेणेकरून शे-दोनशे रु.चा मलिदा लाटण्याचा उद्देश सफल होईल. यासह काउंटरवर उभे राहू नका, बाहेर चला अशा पद्धतीचे उद्धट वर्तन ते ग्राहकांशी नेहमीच करतात. स्वतः मात्र बँकेतच धूम्रपान करतात. दुपारचे शाखेतच झोपतात. या प्रकाराला जनता आता पूर्णपणे कंटाळली असून प्रसंगी वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.
या शाखेचे शाखाधिकारी लोकांना कमी पैसे देतात अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. यापूर्वी या आशयाची शाखाधिकार्‍याच्या विरोधात वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर त्यांनी पारदर्शक कारभाराने ग्राहकांच्या मनामध्ये चांगले स्थान निर्माण करू असे आश्र्वासन दिले होते. परंतु सुंभ जळाला परंतु पीळ मात्र तसाच राहिला या उक्तीप्रमाने काही दिवसातचे ये रे माझ्या मागल्या असंच कामकाज सुरू ठेवले. दरम्यान या शाखाधिकार्यांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचताना ग्राहकांनी सांगितले की, या महाशयांच्या उद्धटपणाचा अक्षरशा कहर झाला आहे. माझे कोणीही वाकडे करू शकत नाही. 

माझी दीड वर्षे येथून बदली होऊच शकत नाही अशा प्रकारच्या वल्गना हे महाशय ग्राहकांसमोर करत आहेत. कोणाच्या जीवावर ते अशा वल्गना करत आहेत याचा संभ्रम मात्र ग्राहकांमध्ये निर्माण झालेला आहे. येथील शिवाजी भिकू यादव हे यात्रेदिवशी पैसे काढण्यासाठी बँकेत आले आणि त्यांनी 57 हजार 200 रुपयाची विड्रॉल दिली शाखाधिकारी यांनी त्यांना 2000 च्या 23, पाचशेच्या दोन नोटा व वीस रुपयाचे पाच बंडल म्हणजे 2000 रु असे एकूण 57000 /- रुपये दिले. यादव यांनी काउंटरवरच पैसे मोजले व लगेच शाखाधिकार्‍यांना दोनशे रुपये कमी असल्याचे सांगितले. परंतु मी मोजून पैसे दिले आहेत असा वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर यादव यांनी वरिष्ठांना फोन करून ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर दोनशे रुपये शाखाधिकारी यांनी त्यांना दिले. असे यापूर्वी अनेक प्रकार घडलेले आहेत. त्याचे वृत्तही छापून आलेले आहे.परंतु या महाशयांना कोणाचा वरदहस्त आहे हे कळत नाही. या अधिकार्‍यांबाबत अधिकारी, पदाधिकार्‍यांना भेटूनही जैसे थे परिस्थिती असल्याने ग्राहकांवर तोंड दाबून बुक्क्‌यांचा मार सहन करण्याची वेळ आलेली आहे. वरिष्ठांना भेटल्यानंतर मार्च वर्षाअखेर आणि आचारसंहितेच्या नावाखाली बदली करता येत नाही असे स्थानिक पदाधिकार्‍यांना सांगण्यात आले. परंतु कवठेचे शाखाधिकारी सोडले तर अन्य ठिकाणच्या बदल्या झाल्या आहेत हे कसे काय ? असा प्रश्र्न पडतो. येथील प्रकाश विठ्ठल यादव यांची तीन महिन्याची व सहा महिन्याची अशी एक लाखाची एफडी काढली आहे. या महाशयांनी परस्पर अफरातफर करून मुदतीच्या आतच ती मोडली. व्याज काढण्यासाठी यादव शाखेत गेले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हे आता नित्याचेच झाले आहे. वरिष्ठांनी चौकशीस यावे, लोकांचे म्हणणे ऐकावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
- या गावांमध्ये डीसीसी बँकेचा विस्तारीत कक्ष होता. त्याचे शाखेत रुपांतर करण्यासाठी स्थानिक पदाधिकार्‍यांनी जिवाचे रान केले. शाखेत रूपांतर झाले. सध्या बँक चांगल्या पद्धतीने सुरू असताना बँकेस अशा शाखाधिकार्यामुळे गालबोट लागत आहे.लोकं ठेवी ठेवताना विचार करत आहेत. याबाबत ही वरिष्ठ पातळीवरुन विचार व्हावा.
- यादव यांच्या तक्रारीवरून बँकेचे वरिष्ठ अधिकारी येथे चौकशीसाठी आले असता त्यांनाही या महाशयांच्या उद्धट वर्तनाला सामोरे जावे लागले. त्यांनीही ही बाब वरिष्ठांना कळविली जाईल असे सांगितले.