Breaking News

काँग्रेसचे माफीसत्र

राजकीय नेत्यांनी सातत्याने तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागायचे असते. विशेषतः ज्या भाषेवर प्रभुत्त्व नाही, त्या भाषेत मत व्यक्तच करायचे नसते. निवडणुकीच्या काळात तर आपल्या प्रत्येक शब्दाचा काय अर्थ निघेल, याचा बोलण्यापूर्वी विचार करायचा असतो. तसा तो केला नाही, तर मग अनर्थ होऊ शकतो. कधी कधी एखादे वाक्य, एखादा शब्द निवडणुकीतील यशापासून दूर ठेवू शकतो. काँग्रेसला त्याचा अनुभव आला आहे. आपल्या एखाद्या विधानाचे राजकीय पडसाद काय उमटतील, याचा विधान उच्चारण्यापूर्वी विचार करायचा असतो. तोंडातून शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही, याचे भान ठेवले पाहिजे. तसे ते ठेवले नाही, तर राजकीय परिणाम भोगावे लागतात. संत तुकारामांनी शब्द जपावा, शब्द घासावा या आपल्या अभंगात शब्द कसे हत्यार होतात, हे समजून सांगितले आहे. उचलली जीभ लावली टाळूला असे केले, की मग तोंडघशी पडायची वेळ येते. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणातील फेरयाचिका चालविण्याचा निर्णय घेतला, ही सरकारला मोठी चपराक नक्कीच होती. अगोदर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला याचिका फेटाळून ‘क्लीन चिट’ दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर फेरयाचिकेची सुनावणी करण्याचा आणि कागदपत्रे ग्राह्य धरण्याचा निर्णय ही मोदी सरकारला चपराक होती. याचिकेत राहुल गांधी कुठेही वादी-प्रतिवादी नाहीत; परंतु राफेल प्रकरणात मोदी यांच्यावर तेच आरोप करीत होते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा विरोधकांसाठी आयते हत्यार होते; परंतु अशा हत्याराचा वापर करताना काळजी घेतली जायला हवी. तशी ती घेतली नाही, तर त्याचे बुमरँग होते. उत्साहाच्या भरात राहुल यांनी लगेच राफेल घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे, असे सांगून टाकले. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ‘चौकीदार चोर है’ यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचा दावाही त्यांनी केला. जे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यावर भाष्य करू नये, एवढे भान राहुल यांनी ठेवायला हवे होते; परंतु तसे ते न ठेवल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागावी लागली. त्याअगोदर दोनदा त्यांनी माफीऐवजी शरणागती हा शब्द वापरून पाहिला; परंतु सर्वोच्च न्यायालयाने भीक घातली नाही. त्यानंतर बिनशर्त माफी मागावी लागली, तरी अजून न्यायालयाच्या अवमानाची याचिका सुरूच आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन राजीव गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदांच्या वक्तव्याकडे आणि माफीनाम्याकडे पाहावे लागेल.
निवडणुकीच्या काळात एखाद्या विधानावरूनही राईचा पर्वत केला जाऊ शकतो आणि त्याने हाती येत असलेले यश दूर जाऊ शकते, हे काँग्रेसला वारंवार अनुभवायला आले असले, तरी या पक्षाचे नेते सुधरायला तयार नाहीत. भाषेची गल्लत होऊ शकते. म्हणायचे असते एक आणि अर्थ निघतो दुसराच असेही होऊ शकते. गुजरातच्या निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नीच हा शब्द वापरला. मोदी अशा टीकेचे संधीत रुपांतर करण्यात पटाईत आहेत. त्यांनी आपण खालच्या जातीतील असल्याने आपल्याविषयी अय्यर यांनी जाणीवपूर्वक हा शब्द वापरला, असा प्रचार सुरू केला आणि त्याचा गुजरातच्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला. अय्यर यांची दिलगिरी आणि निलंबनही काँग्रेसला यशापर्यंत घेऊन जाऊ शकले नाही. त्याअगोदर सोनिया गांधी यांनी मोदी यांना ‘मौत का सौदागर’ असे म्हटले होते. त्याचाही मोदी यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखांचे जे हत्याकांड झाले, ते निषेधार्हच होते. इंदिराजींची हत्या त्यांच्या अंगरक्षकांनीच केली. सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवल्याबद्दल शीख समाजात रोष होता. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता. गुप्तचर विभागने त्यांना तसा इशारा दिला होता. शीख अंगरक्षक बाळगू नका, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता, तरीही केवळ एका धर्माचे असल्याने मी कुणालाही पदावरून काढणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतरचा घटनाक्रम सर्वांसमोर आहे. दिल्लीतील दंगली प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांना गेल्या सहा महिन्यांपूर्वीच न्यायालयाने शिक्षा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी संयमाने वागायला हवे. काँग्रेसच्या नेत्यांना मोदी उचकटून देतात आणि ते अलगद जाळ्यात सापडतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्यानंतरही मोदी यांनी असेच वक्तव्य केले होते. कमलनाथ यांच्याविरोधातील गुन्हे सिद्ध झालेले नाहीत, याचे भानही त्यांनी ठेवले नाही. हिंदीवर प्रभुत्व नसल्यानेच आर. आर. पाटील यांच्या मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतरच्या ‘बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते है’ या विधानामुळे गदारोळ होऊन त्यांना पद सोडावे लागले होते. आताही पित्रोडा यांनी ‘हुआ तो हुआ’ असे वक्तव्य दिल्लीतील दंगलीसंबंधात केले. दिल्ली आणि पंजाबमध्ये अजून लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. अशा वेळी पित्रोडा यांचे वक्तव्य काँग्रेसला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. जे झाले ते वाईट झाले, असे म्हणण्याऐवजी जे झाले, ते झाले, असे ते बोलून गेले. आता ते माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे म्हणत आहेत.
पित्रोडा यांचे वक्तव्य महागात पडेल, असे लक्षात आल्यानंतर काँग्रेसने स्वतःला पित्रोडा यांच्या वक्तव्यापासून दूर ठेवले. त्यांचे ते वैयक्तिक मत होते, असे सांगितले.
पित्रोडा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राहुल गांधी यांना आपले मौन सोडावे लागले. पित्रोडा यांनी अयोग्य वक्तव्य केले असून त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राहुल यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. राहुल यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याआधीच पित्रोडा यांनी दिलगिरी व्यक्त केली. पित्रोडा यांच्या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 1984 सालच्या शीख विरोधी दंगल प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. जे कोणी याला जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. 1984 साली जे घडले ते भयंकर दु:खद होते. असे पुन्हा घडता कामा नये. पित्रोडा जे म्हणाले, ते अयोग्य आहे. मी याबद्दल त्यांच्याशी थेट बोलणार आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, असे राहुल यांनी म्हटले आहे. हा डॅमेज कंट्रोलचाच भाग आहे. पित्रोडा चुकल्याची माफी त्यांनी मागितली. गुजरातच्या दंगलीनंतर मोदी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही अशीच संताप आणणारी होती. त्यावर त्यांनी माफी मागितल्याचे ऐकिवात नाही. गाडी रस्त्याने जात असताना तिच्याखाली येऊन अनेक कुत्री मरतात, त्यावर शोक करीत बसायचे का, असा सवाल मोदी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला होता. त्यांचा रोख कुणाकडे होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही; परंतु मोदी यांना जी टीकेचे संधीत सोने करण्याची जी कला अवगत आहे, ती इतरांना नाही आणि त्यातच मोदी यांचे फावते आहे.