Breaking News

विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनाचे पैसे थेट शाळांच्या खात्यात


अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देणार्‍या योजनेतील पैशांची अफरातफर थांबविण्यासाठी या योजनेवर होणारा खर्च थेट शाळांच्या नावावर वर्ग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या योजनेतील खर्च होणारे पैसे थेठ शाळांच्या खात्यावर जमा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार नाही असे शासनाचे मत आहे. त्यानुसार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ही रक्कम थेट शाळांना मिळणार आहे.

दरवर्षी सुमारे 1100 कोटी रुपये खर्च होणार्‍या माध्यान्ह भोजन वाटपात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनेे शिक्षण विभागांने हा निर्णय घेतला आहे. या योजनेचा निधी आतापर्यंत राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंतर पंचायत समिती, त्यानंतर तो शाळांना मिळत असे. आता हा निधी थेट शाळांच्या खात्यात जमा होणार असल्याने निधीतील गैरव्यवहाराला आळा बसणार आहे.
माध्यान्ह भोजनाचे पैसे दोन तीन टप्प्प्यानंतर शाळांना मिळत असल्याने विलंब लागत असे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना निधी मिळेपर्यंत पदरमोड करुन किंवा दुकानदाराकडून उधारीवर किराणा सामान व भाजीपाला आणून विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवण्याची व्यवस्था करावी लागत असे. काही शाळांना 3-4 महिने निधी मिळत नसल्याने किराणा दुकानदार पैशांचा तगादा लावत असे. पैसे न दिल्याने ते किराणा माल देत नसत. विद्यार्थ्यांना तर उपाशी ठेवता येत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करुन नंतर निधी आल्यावर ते पैसे घेत असत. 

आता या नव्या निर्णयामुळे शाळांना दर महिन्याला राज्य सरकारकडून थेट निधी उपलब्ध होणार असल्याने भोजन देण्यास अडचणी येणार नाहीत. हा निधी थेट शाळांच्या खात्यात जमा करण्याच्यासाठी शाळांची सर्व खाती ऑ्रनलाईन करण्यात आली आहेत. ही खाती केवळ एकाच्या नव्हे तर मुख्याध्यापक व एक पालक यांच्या नावे उघडण्यात येतील. त्यामुळे शाळेकडून होणारा बँक खात्यातील हस्तक्षेपही रोखला जाणार आहे. पैसे थेट शाळेच्या खात्यावर जमा होणार असल्याने मुख्याध्यापकांवर येणारा आर्थिक ताणही संपणार आहे तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर चांगले जेवण मिळू शकेल असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

शाळांना कॉन्टॅ्रक्टरमार्फत तांदळाचे वितरण केले जाते. त्यावर नजर ठेवण्याची कोणतीच यंत्रणा नाही. त्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्याची सूचना अधिकारी करीत आहेत. तांदळाचे वितरण तपासण्याची यंत्रणा उभी राहिली तर गैरप्रकार रोखले जातील, असे अधिकारी सांगतात. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 100 गॅ्रम तांदूळ, 20 ग्रॅम डाळ व सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना 950 गॅ्रम तांदूळ, 30 ग्रॅम डाळ दिली जाते. शाळेला मिळालेल्या पैशातून भाजीपाला व किराणा घ्यावा लागतो असे अधिकार्‍यांनी सांगितले.