Breaking News

कमल हसन यांना हिंदु महासभेची जीवे मारण्याची धमकी


नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसेवर केलेल्या टिपणीमुळे आता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एआयडीएमके पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे मंत्री बालाजी यांनी कमल हसनची जीभ छाटू असे आव्हान दिले आहे. ‘ नथुराम गोडसे स्वंतत्र भारतातील पहिला हिंदू अतिरेकी आहे’ असे वक्तव्य काल कमल हसन यांनी केले होते. त्यानंतर आता हिंदू महासभा देखील आक्रमक झाली आहे. गोडसेला दहशतवादी बोलणारे हिंदुच्या नावावर कलंक आहेत. कमल हसन यांना गांधीकडे पोहोचवण्याची तयारी केली जाईल, असे वक्तव्य अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी सोमवारी मेरठ येथे केले. सवंग लोकप्रियतेसाठी जर गोडसेला आंतकवादी ठरवले जात असेल तर कमल हसन हे स्वतःच्या मृत्यूला स्वतःच जबाबदार असतील. 

गोडसे हिंदुसाठी आदर्श आहेत आणि राहतील, असे वक्तव्य अभिषेक अग्रवाल यांनी केले आहे. तसेच फारूख अब्दुल्ला, नवज्योतसिंह सिद्धू आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यासारखे लोकच दहशतवाद्यांना आश्रय देतात, असा आरोप देखील अग्रवाल यांनी केला आहे. मक्कल निधी मियाम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी चेन्नई येथे एका प्रचारसभेदरम्यान नथुराम गोडसले स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी म्हणून संबोधले होते. कमल हसनच्या या वक्तव्यावर देशभरासहीत तामिळनाडूतही विरोध होत आहे. राज्याचे दुग्धोत्पादन मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी तर ‘कमल हसन यांची जीभ छाटा’, असे वक्तव्य केले आहे. तसेच कमल हसन यांच्या मक्कल निधी मियाम या पक्षावर हिंसा पसरवण्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.