Breaking News

उरमोडी नदीकाठच्या ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल


शेंद्रे / प्रतिनिधी : सध्या सर्वत्र पसरलेल्या दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. असह्य उन्हाळ्यामुळे संपूर्ण जनजीवन होरपळत आहे. या भागातनू वाहणारी उरमोडी नदीत सुध्दा पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे. परिणामी, नदीकाठच्या गावावर पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे.

उरमोडी नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या पाणी योजना आहेत. या नदीपात्रालगत अनेक गावांनी पाणी मिळविण्यासाठी या ठिकाणी अनेक विहिरी काढल्या आहेत. सतत वाहणार्‍या नदीतील पाण्यामुळे या विहिरींमध्ये सुध्दा पाणी असते. योजनांच्या माध्यमातून हे पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच या नदीवर शहापूर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या शहापूर योजनेच्या पाण्याचा मुबलक प्रमाणात पिण्यासाठी वापर केला जातो.

परळी गावापासून काशिळपर्यंत या नदीच्या पाण्याचा वापर गाव वाड्यांना पाणी मिळवून देण्यासाठी केला जातो. तसेच या पाण्यावर लोकांचे जनजीवन अवलंबून आहे. परंतु, गेले काही दिवस नदी पात्रात उरमोडी धरणातील पाणी सोडले नाही. त्यामुळे अनेक गावांना याचा फटका बसला आहे. लोकांना प्यायला सुध्दा पाणी मिळेनासे झाले आहे.

नदी पात्रात पाणीच नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या विहीरीही कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत.ज्या विहिरींमध्ये थोडेफार पाणी आहे त्याचे नियोजन करुन एकदिवसा आड पाणीपुरवठा संबंधित गांवाना केला जात आहे.

पाण्याअभावी नदीतील मासे मृत अवस्थेत आढळून येत आहेत. जनावरांना व माणसांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी उभी पिके करपू लागली आहेत.

उरमोडी जलसिंचन विभागाने, जिल्हा अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पहावे व उरमोडी धरणातून पाणी सोडण्यासाठी संबंधिताना भाग पाडावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.