Breaking News

भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी कर्जतची कन्या


कर्जत/प्रतिनिधी: कर्जत तालुक्याचे भूषण असलेली महान भारत कुमारी केसरी किताब विजेती सुवर्णकन्या एनआयएस कोच शबनम शेख हिची भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अस्ताना (कजाकिस्तान)आणि सोफिया (बुल्गारिया ) येथे होत असलेल्या एशियन चॅम्पीयनशिप व विश्व कुस्ती चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी रेस्लींग फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे शबनम शेख हिची भारतीय महिला कुस्ती संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय संघातील महिला कुस्तीपटूंना लखनऊ येथे दि. ५ मे ते २९ जुलै पर्यंत कु. शबनम शेख ही प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षणानंतर स्पर्धेसाठी कजाकिस्तान व बुल्गारियाला तिच्या नेतृत्वाखाली संघ रवाना होणार आहे. सलग तीन वर्षापासून भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून तिची निवड करण्यात येत आहे या आधी तिने भारतीय संघाला अनेक वेळा चॅम्पियनशिप तसेच अनेक पदके मिळवून दिलेली आहेत. तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघाने तिची पुन्हा निवड केली आहे.

शबनम शेख ही पटियाला येथे एनआयएस कोच ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. सलग आठ वेळा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवुन सुवर्णकन्या होण्याचा मान तिने प्राप्त केलेला असुन साई केसरी , लातुर केसरी, कर्नाटक केसरीचा बहुमान तीने मिळविला आहे .आतापर्यंत कु.शबनम शेख हिस राज्यभरातुन अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा तिचा मानस आहे. शबनम ही कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील सेवानिवृत्त लष्करी जवान शब्बीर शेख यांची कन्या असून निवडीबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.