Breaking News

साडी सेंटरला आग; पाच कामगार ठार

Image result for साडी सेंटरला आग; पाच कामगार ठार
पुणे / प्रतिनिधीः पुण्यातील देवाची उरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपो या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. राकेश रियाड (वय 22), धर्मराम वाडियासार (वय 25),राकेश मेघवाल (वय 25), सूरज शर्मा (वय 25 सर्व रा. राहणार राजस्थान) तर धीरज चांडक (वय 23), रा. लातूर अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.
गुरूवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही, असे त्यांनी सांगितले; परंतु मॅनेजर तेथे पोहचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. दुसर्‍या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली; मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. सुमारे सात हजार चौरस फुटाच्या या दुकानात साडी व रेडिमेड कपड्यांचे दालन होते. राहण्याची स्वतंत्र सोय नसल्याने कामगार तेथेच मुक्काम करीत. चोरी होईल या भीतीने दुकानाला बाहेरून कुलूप लावले जात असे. बाहेरून कुलूप असल्यामुळे कामगारांना बाहेर पडता आले नाही. उरळी देवाची येथील राजू भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. या आगीत सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.