Breaking News

माढ्यात कोण विजयी होणार? घड्याळ की कमळ याकडे सर्वांचेच लक्ष


श्रीकृष्ण सातव / कोळकी : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजय शिंदे विरूद्ध भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांची लढत होत असून माढ्यात महाआघाडी वंचित राहणार? की पहिल्यांदाच कमळ फुलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. शिंदे आणि निंबाळकर हे जरी उमेदवार असले तरी माढ्यात मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे.

माढा मतदारसंघातून माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे घोषित केले होते. परंतु, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे माढ्याचा तिढा आणखी वाढला होता, तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील माढ्यातून राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला.तर राष्ट्रवादीने माढ्यातून ऐनवेळी सध्याचे भाजप पुरस्कृत सोलापूर जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली आणि माढा लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली. मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून संजय शिंदे यांची ओळख आहे त्यांची आणि मोहिते-पाटील यांचे राजकीय वैर सर्व जिल्ह्याला माहिती असल्यामुळे माढा लोकसभेला रंगत वाढलेली आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात माण - खटाव, सांगोला आणि माळशिरस मधून निर्णायक आघाडी मिळणार असल्याने महायुतीचा विजय निश्र्चित असल्याचे रासप प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी सांगितले.रासपला मानणारा वर्ग ठामपणे भाजपच्या मागे उभा राहिल्याने माढ्यात भाजपच जिंकणार असा दावा हाके यांनी केला आहे. सांगोला तालुक्यात सर्व जिल्हा परिषद गटातून कमळ आघाडीवर राहणार आहे. सांगोला तालुक्यात दहा हजारापेक्षा अधिक मताधिक्य निंबाळकर यांना मिळेल. दुष्काळी तालुक्यातील जनतेने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला आहे.विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान झालेले आहे. खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपने कुणालाही उमेदवारी दिली तरी त्यांना निवडून आणू, असे सांगितले होते. सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि माढ्यात उलटसुलट चर्चेला ऊत आला. मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये 2009 साली माढा मतदारसंघ नव्याने निर्माण करण्यात आला.

सन 2009 मध्ये माढ्यातून शरद पवार विजयी झाले होते.त्यांनी सध्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता, 2014 साली मोदी लाट असताना विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते .त्यांनी सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव केलेला होता.त्यामुळे माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जाऊ लागला. आता परिस्थिती वेगळी आहे.

माढ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला तर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कमकुवत होईल.आणि संजय शिंदे निवडून आले तर सोलापूर जिल्हात त्यांचा दबदबा वाढेल.त्यामुळे संजय शिंदे यांना निवडणूकीत पराभूत करण्यासाठी मोहिते-पाटील यांनी कंबर कसलेली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात लढाई जरी शिंदे आणि निंबाळकरांची असली तरी पवार आणि मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागलेली आहे.

सध्या माढ्यात संजय शिंदेना रोखण्यासाठी भाजप कडून कोंडी करण्यात आलेली आहे. माढा मतदारसंघात समावेश असलेल्या माण विधानसभेचे आ.जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे तसेच कॉंग्रेसचे कल्याणराव काळे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढलेली आहे. माढ्यात प्रथमच कमळ फुलविण्यासाठी भाजपने चांगलीच तयारी केलेली आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर 34 हजार मतांनी विजयी होतील असा दावा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केला आहे

तर संजय मामा शिंदे लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले आहे कर्जत जामखेड येथे ते दुष्काळी दौर्‍यावर जात असताना करमाळा येथे शहरातील पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले असता त्या त्यावेळी ते बोलत होते. 23 मे ला गुलाल तयार ठेवा .मी मामांच्या विजय विजयी सभेला येईन असे त्यांनी सांगितले. करमाळ्यातून शिवसेनेचे आ. नारायण पाटील ,माढ्यातून आ. तानाजी सावंत तसेच सांगोल्यातून माजी आ. शहाजी पाटील, यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसलेली दिसते. तर पंढरपूर तालुक्यातील सुमारे 52 गावांचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात आहे तेथून विधान परिषदेचे आ. प्रशांत परिचारक तर कल्याणराव काळे यांनीही निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी चागलीच क्षेत्ररक्षण (फिल्डिंग )लावलेले आहे. माळशिरस तालुक्यात वातावरण भाजपमय झालेले आहे. एकेकाळी कट्टर विरोधक असलेले उत्तम जानकर आणि मोहिते-पाटील सध्या एकत्रित आल्यामुळे त्याचा फायदा भाजला होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची या सर्वांनी कसून प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्‌यात ,माढ्यात , महाआघाडी वंचित राहणार की प्रथमच महायुतीचा उमेदवार विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.जर संजय मामा शिंदे विजयी झाले तर मात्र मुरब्बी राजकारणी शरद पवार यांचा तो विजय मानण्यात येईल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावरील त्यांची पकड आणखीनच घट्ट होईल. काय होते ते 24 मेला कळेलच . घोडामैदान जवळ आहे.