Breaking News

छत्रपती घराण्यावर पराभवाची वेळ येवू नये; निवडून आलात तर आता जनतेसाठी कामेही करा, उदयनराजेंकडून सातारकरांची अपेक्षा


सातारा / प्रतिनिधी - लोकसभेच्या निवडणूक रणांगणात सातारा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत खा. उदयनराजे भोसले यांनी सलग तिसर्‍यांदा बाजी मारत हॅटट्रीक केली. यावेळेला मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही. परिणामी, उदयनराजेंसह त्यांच्या समर्थकांवर मंथन करण्याची वेळ आली आहे. उदयनराजेंच्या विजयानंतर सोशल मिडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. उदयनराजे तुम्ही निवडून आलात, तुमचे अभिनंदन. परंतु, आता जनतेसाठी विकासाची कामे सुध्दा करा, अशा प्रकारचा अपेक्षा व्यक्त करणार्‍या पोष्टनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मिडियावरील अशाप्रकारच्या वादळी पोष्टमुळे उदयनराजेंवर खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे.

उदयनराजे यांनी मतदारसंघात काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याबाबत गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर सोशल मिडियातून रान उठले. एका सातारकराने त्यांना लिहिलेले पत्र सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहे. व्हायरल झालेल्या पत्रातील मजूकर असा आहे.

मा. श्री. छ. उदयनराजे यांस,
सर्व प्रथम आपण पुन्हा एकदा निवडून आलात त्या बद्दल आपले अभिनंदन. आपण विजय साजरा करण्यात मश्गुल होण्या आधी आणि पुन्हा 4 वर्षांसाठी गायब होण्याआधी आपल्याला काही परिस्थितींची जाणीव करून देण्याचा हा माझा केविलवाणा प्रयत्न... आपण निवडून आलात खरे पण जी 4 ते 5 लाख मते आपल्या विरोधकांना पडलेली आहेत ती केवळ मते नाहीत तर सातार्‍याचे 4 ते 5 लाख दुखावलेली जनता आहे. मागच्या वेळी आपण 3.5 लक्ष इतक्या यशस्वी लीडने जिंकून आला होतात पण यंदा ते लीड काही हजारांवर आले आहे यावरून आपण काय ते ओळखावे. केवळ आपले दैवच बलवत्तर आणि आपल्या सातार्‍यातील काही सरंजाम शाहीमधून अजून बाहेर न पडलेल्या जनतेमुळेच आपण निवडून आलात. जी 3 ते 4 लाख मते आपल्या विरोधात आहेत ती कोणा भक्कम उमेदवारामुळे नाही तर आपल्या दुर्लक्षितपणाला त्रासलेल्या सातारच्या युवकांची आहेत. गेल्या 10 वर्षांच्या आपल्या सत्ते मध्ये आपण आमच्यासाठी काय उभारू शकलात हे मोजायचे झाले तर एका हाताची पाच बोटे पण जास्त पडतील. शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज, कारखाने, कंपणी, उद्योग संस्था यापैकी काहीच आपण उभारू न शकल्याने आमच्या सारख्या अनेक तरुणांना सातारा सोडून पुणे मुंबई सारख्या शहरात कामासाठी भटकत फिरावे लागते आहे. याचा आपण सखोल विचार करावा आणि जिंकल्याचा आनंद साजरा करण्या पेक्षा आपण इतके सातारकर का दुखावले गेले आहेत याचा विचार करावात ही विनंती.

आपल्या नावापुढे छत्रपती ही पदवी आहे त्यामुळे आपला नेहमी आदर राहिलच परंतु, छत्रपती घराण्याचा पराभव व्हावा ही वेळ आपणावर आणि एक रयत म्हणून आमच्यावर पुन्हा येऊ नये हिच सदिच्छा.