Breaking News

महाराष्ट्रात यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस


बुलडाणा : यंदाचे वर्ष शेतकर्‍यांसाठी कसे असेल? लोकसभेच्या निवडणुकांनतर काय निकाल येतील. याची उत्सुकता देशभरात आहे. भेंडवळची भविष्यवाणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भविष्यवाणीतून यंदाचे वर्ष शेतकर्‍यांसाठी सर्वसाधारण राहणार असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. तसेच देशात स्थिर सरकार येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी देशाच्या सुरक्षेबद्दलचे भाकितही वर्तवण्यात आले. भारतीय सुरक्षा भक्कम राहील. परकीय घुसखोरी होत राहणार असून, भारतीय संरक्षण खातं त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असेही सांगण्यात आले.

पाऊस, पीक, राजा, संरक्षण आणि आर्थिक अशा पाच गोष्टींचा भेंडवळच्या भविष्यवाणीत समावेश असतो. भेंडवळच्या भविष्यवाणीला सुमारे साडे तीनशे वर्षाची परंपरा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी बुधवारी आठ मे रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली. यामध्ये नैसर्गिक संकटांची सरबत्ती, पाऊस कमी तर पिके सर्वसाधारण सांगितले असल्याने शेतकर्‍यांना यंदा फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याचे दिसून आले. पीक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. ही भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तवली आहे. ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच आजूबाजूच्या गावातून हजारो शेतकरी येथे आले होते.
यंदा पाऊस सर्वसाधारण राहील. पहिल्या महिन्यात साधारण पाऊस असेल. कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडेल. दुसर्‍या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे. तिसर्‍या महिन्यात कमी-जास्त पाऊस पडेल. मात्र, पहिल्या महिन्याच्या तुलनेनं नक्कीच अधिक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चौथ्या महिन्यात लहरी स्वरुपाचा पाऊस पडेल. यावर्षी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच नैसर्गिक संकट कोसळण्याची शक्यता असून, भूकंपासारखी आपत्तीही येऊ शकते, असं या भविष्यवाणीतून सांगण्यात आलं. 

यावेळी पीकांबद्दलचंही भाकित वर्तवण्यात आलं. अंबाळी मोघम असेल. रोगराई नसेल. कापसाचं उत्पादन मोघम असेल आणि भाव मध्यम राहील. ज्वारीचं पीक सर्वसाधारण असेल. भावात तेजी नसेल. गव्हाचं पीक मोघम स्वरुपाचं असेल. तांदळाचं उत्पादन मोघम राहील. तुरीचं उत्पादन चांगलं असेल. मुगाचं उत्पादन मोघम राहील. उडदाचं उत्पादन सर्वसाधारण राहील. तीळ उत्पादन मोघम, भादलीवर रोगराईची शक्यता आहे. बाजरी उत्पादन सर्वसाधारण असलं तरी भावात तेजी असेल. हरभर्‍याचं उत्पादन सर्वसाधारण असेल, असं भाकित वर्तवलं आहे.

देशाला आर्थिक संकटाना सामौरे जावे लागणार

भेंडवळच्या भविष्यवाणीतून घटमांडणीत सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा कायम आहे. पान स्थिर आहे. त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी किंचित हललेली आहे. पण सत्ता स्थिर राहणार असल्याचे भविष्यवाणीतून सांगण्यात आले. करंजी हललेली असून, देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

चारा-पाण्याची टंचाई येईल तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी फुटलेली आहे म्हणजेच अर्थव्यवस्था डगमगेल आर्थिक ताण देशावर येईल. परकीय घुसखोरी होत राहणार. मात्र, भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल. परंतु त्याला मात्र आपले संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल तर राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर तेचे संकेत दिले आहेत. गटातील चारा-पाण्याची प्रतीक असलेली चांडोली कोरडी गायब आहे. त्यामुळे भीषण चारा टंचाई यावर्षी होणार आहे. तरी शेतकर्‍यांनी गुराढोरांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.