Breaking News

कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेची विश्‍वासहर्ता नसल्याने बळीराजा हवालदिल


उंब्रज / प्रतिनिधी : सातारा जिल्हा हा पश्‍चिम महाराष्ट्रातील एक सधन जिल्हा परंतु परवाच्या सातारा तालुक्यातील दोन शेतकरी आत्महत्यांनी खळबळ माजली असून दुष्काळ हा शब्द आजच्या घडीला काळजाचा थरकाप उडवणारा झाला आहे. कारण बागायती भागासाह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. यातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढू लागले आहे.सरकार मात्र आपल्याच चक्रव्यूहात अडकल्यासारखे वागत असल्याने जनता सैरभैर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळ हा शब्द आजच्या घडीला कळीचा झाला आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. यातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढू लागले आहे. निसर्गाने बळीराजाच्या जगण्याची उमेद संपविण्याचा जणू निर्धारच केला आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस, कडक उन्हाळा,वळवाच्या सरींचाही यंदा दुष्काळ पहायला मिळाला.रब्बी हंगाम कमी पाण्याने वाया घातला तर खरीप हंगाम दुष्काळामुळे वाया गेला आहे. यामुळे जगण्यासाठी लागणारी उमेद बळीराजाने आणायची कुठून, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.लहरी निसर्गामुळे शेतकरी दिवसागणिक नैराश्याच्या गर्तेत सापडत आहे. सातारा जिल्यातील लिंब व वनगळ येथील दोन तरुण शेतकर्‍यांनी ऐन दुष्काळात कर्जाच्या बोजाने जीवनयात्रा संपवली. कारण दोन वर्षांपासून हाती पीकच न आल्यामुळे लोकांची देणी द्यायची कशी, हा यक्षप्रश्‍न त्यांच्यापुढे आ वासून उभा होता. रोजच घरी पैशांसाठी तगादा लावणार्‍यांना उत्तर तरी काय द्यायचे, हा प्रश्‍न त्यांना सतावत होता. यामुळे आपल्या मुलाबाळांचा व वृद्ध आई वडिलांचाही विचार त्यांच्या मनात आला नाही. डोळ्यापुढे फक्त कर्जाचा डोंगर दिसत असल्याने जगण्याची उमेदच ते हरवून बसले होते. अशावेळी त्यांना खरेतर मानसिक आधाराची गरज होती. मात्र, कर्जाच्या ओझ्याखाली त्यांचं आयुष्यचं दबलं गेल्याने त्यांना मृत्यू जवळचा वाटला.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे हे सत्र गेली अनेक वर्ष सुरूच आहे. कधी अवकाळी पावसाने घशातला घास हिरावला म्हणून तर, आता दुष्काळामुळे बळीराजा जीवनयात्रा संपवत आहे. आज अनेक जिल्हे दुष्काळात होरपळत आहेत. दुष्काळाची छाया गडद झाली असून शेतकरी आत्महत्येचे हे सत्र थांबायला तयार नाही. शेतकर्‍यांना सावरणारे सरकार अजूनही जागे झालेले नाही. विरोधकांसाठी दुष्काळ नावाचे मोठे हत्यारच सरकारवर उगारण्यासाठी मिळाले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सर्वपक्षीय मात्र उपाय योजताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे.

पाणलोट क्षेत्रातच पावसाने ओढ दिल्याने धरणांची तहान भागलेली नाही. माण, खटाव,फलटण,खंडाळा कोरेगाव या पट्ट्यातील पाचही तालुक्यात आज चारा व पाण्याची वाईट स्थिती आहे. यामुळे पाणी चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत. येत्या काळात हीच परिस्थिती राहिली तर पाण्यावरून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्येच नव्हे तर गावा-गावांमध्ये संघर्ष पहाण्याची वेळ येऊ शकते, इतकी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. यंदाचे हे वर्ष शेतकर्‍यांसाठी सर्वांर्थाने अत्यंत दुःखदायी ठरत आहे. दुष्काळाने बळीराजाचे कंबरडे मोडले. यातून शेतकरी शेवटपर्यंत सावरू शकला नाही. हे चक्र गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्‍यांचा पिच्छा पुरवत आहे. यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने बळीराजा मृत्यूला कवटाळत आहे. गेल्या नुकसानीची भरपाईची रक्कम आता कुठे पदरात पडत असताना त्यावर घर चालविणेही मुश्किल आहे, तर बँका आणि सावकारांचे कर्ज फेडणे दूरच! कांद्याचे दर वाढले म्हणून सरकारने कांदा आयातीचा तडकाफडकी निर्णय घेतला. मात्र आता शेतकर्‍यांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्यांना जगण्याची उमेद देण्याचा निर्णय केव्हा घेणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनेक दौर्‍यात दुष्काळग्रस्तांनी ‘आश्‍वासने नकोत, कर्जमाफीचे बोला’ अशी घोषणाबाजी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाविरोधात लढण्यासाठी कुठलेही ठोस पावले उचलण्याचे सूतोवाच केले नाही. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना मदत म्हणून शेततळे आणि रोजगार देण्याचे आश्‍वासन तेवढे दिले. काळजाला टोचणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना उत्तर देणेही मुख्यमंत्र्यांना शक्य न झाल्याने वेगळ्याच मुद्द्यावर भाषण द्यावे लागले. यामुळे शेतकरीप्रश्‍नी प्रशासन व सरकारला आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.कृषिप्रधान देश म्हणून आपण तोरा मिरवितो. मात्र, शेतकरी जगला पाहिजे, यासाठी कधीही ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत. दिवंगत पंजाबराव देशमुख कृषिमंत्री असताना देशात ऐंशी टक्के शेतकरी होते. 

आज अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून, देशात केवळ 45 टक्के शेतकरी उरले आहेत. पावसाचे चक्र असेच कायम राहिले तर ही संख्या कमी व्हायला वेळ लागणार नाही.आज पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. धरणे कोरडी आहेत. यामुळे टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न घोंघावत आहे. जनावरांना टँकरचे पाणी पाजावे लागत आहे. बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.