Breaking News

नथुराम गोडसे हा दहशतवादीच : प्रकाश आंबेडकर

Image result for नथुराम गोडसे हा दहशतवादीच : प्रकाश आंबेडकर
कोल्हापूर : अभिनेता कमल हसन यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणार्‍या नथुराम गोडसे याला दहशतवादी म्हटले आहे. कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसर्‍याचा जीव घ्यायचा तर त्याला दहशतवादीच म्हटले पाहिजे. परंतु तो व्यक्ती कोणत्या धर्माचा असेल अथवा तो कोणत्या धर्माला मनात असेल तर तो धर्मही दहशतवादी असेल असे नाही, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते कोल्हापुरात बोलत होते.

कोणत्याही माणसाला धर्म जोडणे चुकीचे आहे. तो हिंदू होता म्हणून दहशतवादी आहे. असे मी म्हणत नाही. व्यक्ती म्हणून नथुराम गोडसेचा ज्यावेळी आपण विचार करतो. त्यावेळी कोणत्याही व्यक्तीचा जीव घेणारा माणूस हा दहशतवादीच आहे, असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्यानंतर बहुजन वंचित आघाडी ने विधानसभेची व्यूहरचना आखण्याससाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक शुक्रवारी कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या नियोजन कोणत्या पद्धतीने असेल हे स्पष्ट केलं. 23 मे नंतर बराच मोठा बदल घडेल. येणारा निकाल या घासून-पुसून असणार आहे. त्यामुळे फार मोठी लीड कोणाला असेल असे मला वाटत नाही. जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी निवडून आलेला असेल शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल. काय होणार नाही याची उत्सुकता शेवटपर्यंत राहील, असेही आंबेडकर म्हणाले .

तसेच वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे . आपण कोणत्याच पक्षासोबत हातमिळवणी करणार नाही , अशी माहितीही आंबेडकरांनी दिली . राज्यातील 288 विधानसभेच्या जागा आपण स्वबळावर लढवाव्यात त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आहोत. परंतु, आम्ही कोणाला सोबत घ्यायचं त्यासाठी आम्हाला त्यांचे विचार पटनं गरजेचे आहे. असे देखील ते म्हणाले आहेत.