Breaking News

आगामी निवडणुकांवर विरोधकांनी बहिष्कार टाकावा : आंबेडकर


मुंबई : राज्यातच नव्हे तर देशभरात भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही, तोपर्यंत विरोधकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा असे आवाहन केले आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर राज्यातील सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या सभेला होणार्‍या गर्दीमुळे सत्ताधार्‍यांच्या गोटात धडकी भरली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे उमेदवार वगळता इतरत्र कोणताही उमेदवार निवडून येतांना दिसला नाही. आतापर्यंत निवडणुकीचा निकाल पाहता भाजप -शिवसेनेची महायुतीच आघाडीवर आहे. हे चित्र पाहता प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. येत्या सर्व निवडणुकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

जोपर्यंत बॅलेट पेपर येत नाहीत तोपर्यंत निवडणुका लढवू नये, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षांना केले आहे. राज्यातील 48 जागांपैकी काही जागांवर वंचित बहुजन आघाडीने काही जागांवर बर्‍यांपैकी मतदान घेतले असले, तरी, कोणताही उमेदवार विजयी झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएममशीनवर संशयाचा राग आळवणे सुरू केला आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेत, ईव्हीएम मशीन असून, त्यात बदल केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. देशांतील 22 विरोधी पक्षांनी 50 टक्के व्हीव्हीपॅटसोबत निकाल जुळवून बघण्याची मागणी केली होती. त्यानंतर निकालानंतर विरोधकांनी पुन्हा ईव्हीएममशीनवर संशय व्यक्त केला आहे.