Breaking News

दखल बढाया मारण्याच्या नादात तोंडघशी

 

 देशाच्या राज्यघटनेत विज्ञानाचा पुरस्कार केला आहे, अंधश्रद्धांचा नाही. विज्ञान कार्यकारणभावावर आधारित असते. देशाच्या प्रमुखानं तरी किमान राज्यघटनेचा आदर करून कारभार चालवायचा असतो; परंतु जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपतीला जगातील पहिली अवयवारोपण शस्त्रक्रिया संबोधलं, तिथं त्यांच्याकडून वैज्ञानिक जागराची अपेक्षा तरी कशी करायची? जी गोष्ट माहीत नाही, ती माहिती करून घेऊन बोलायचं, तर तसंही नाही. त्यामुळं मग तोंडघशी पडायची वेळ येते आणि हसूही होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा ‘इस्त्रो’मध्ये गेले होते. त्यांनी तिथल्या शास्त्रज्ञांचं कौतुक करणं अपेक्षित होतं. त्यांनी तसं केलंही; परंतु बोलण्याच्या ओघात हे तर आपल्या पुराणातही उपलब्ध आहे, असं सांगितलं. पुराणातल्या गोष्टी पुराणात ठेवल्या पाहिजेत. त्या वेळी होतं, तर मग आताच संशोधन कसं झालं, याचं उत्तर देता येत नाही. वैज्ञानिकांपुढं बोलताना त्यांचा उपमर्द होणार नाही, हे पाहायला हवं. त्यांची उमेद वाढवायला हवी. वैज्ञानिक नाउमेद होणार नाहीत, याची दखल घ्यायला हवी; परंतु मोदी काहीच भान पाळत नाहीत. अशास्त्रीय विधानं करण्यावरून देशातील शास्त्रज्ञांनी मोदी यांच्याविरोधात मागं पवित्रा घेतला होता. मूठभर असलं, की त्याचं पोतभर करून सांगण्याची सवय मोदी यांना आहे. चांगलं काम केलं असेल, तर त्याचा गवगवा अवश्य करावा; परंतु ते करताना आपण काही चुकीचं तर करीत नाही ना, याचंही भान असायला हवं. आताही ढगाळ हवामानातही जैश-ए-मोहंमदच्या तळावर हवाई हल्ला करण्याचा सल्ला आपण दिला होता, असं मोदी यांनी सांगितलं. ढगाळ हवामान, पाऊस यामुळं हल्ला करावा, की नाही, याबाबत हवाई दलाचे तसंच
अन्य अधिकारी सांशक होते, असं त्यांना त्यातून सुचवायचं होतं. वातावरण अचानक बिघडलं. भरपूर पाऊस पडला, त्यामुळं आमच्या समोर पेच तयार झाला. तज्ज्ञ लोक (हल्ल्याची) तारीख बदलण्याच्या विचारात होते; पण मी म्हटलं इतके ढग आहेत, पाऊस पडत आहेत. म्हणजे आपण (पाकिस्तानी) रडारपासून वाचू शकतो. काय करायचं याच विचारात सगळे होते. मग मी म्हटलं ढग आहेत, जा.... आणि (सैन्य) निघालं, असं मोदी यांनी त्या मुलाखतीत सांगितलं. मोदी यांची मुलाखत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ट्वीटरवर टाकली. आपला नेता किती हुशार आहे आणि वैज्ञानिक, तंत्रज्ञानांनाही तो कसा सल्ला देतो, प्रतिकूल परिस्थितीतही कशी माघार घेत नाही, हे त्यांना त्यातून दाखवायचं होतं; परंतु झालं भलतंच. मोदी यांच्या मुलाखतीतील हा भाग त्यांचं अज्ञान तर प्रगट करतोच; शिवाय वैज्ञानिकांच्या क्षमतेवरही अविश्‍वास दाखवतो. त्यामुळं ट्वीटरवर टाकलेला मजकूर चांगलाच ट्रोल झाला आणि भाजपाईंना ट्वीटरवरचा मजकूर काढून टाकावा लागला.

मुलांना परीक्षेच्या काळात ‘मन की बात’मधून टिप्स देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगाळ हवामानात रडार काम करीत नाही, असं जे सूचित केलं, त्यामुळं पदार्थविज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना कोड्यात टाकलं आहे. पंतप्रधान म्हणतात, की बालाकोट हल्ल्याच्या काळात भारतीय सैन्यानं ढगांचा तांत्रिक रूपानं फायदा घेतला आणि भारतीय मिराज पाकिस्तानच्या रडारपासून बचावलं. त्यामुळं त्यांना लक्ष्यभेद करता आला. रडार कोणत्याही हवामानात काम करण्यासाठी सक्षम असतं आणि सूक्ष्मलहरींच्या (मायक्रोवेव्ह) मदतीनं विमानाचं स्थान ओळखू शकतं असं आतापर्यंत पदार्थविज्ञान विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं आहे. मोदी यांच्या या विधानानंतर ‘सोशल मीडिया’वर त्याची खिल्ली उडवली जात आहे. त्यांना भौतिकशास्त्र शिकण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. ढगांचा रडारवर कोणताही परिणाम होत नाही. त्याच्या सूक्ष्मलहरी ढगांना भेदून जातात आणि विमानाचं स्थान शोधतात. मोदी यांचं विधान तंत्रज्ञानाच्यादृष्टीनं पूर्ण चुकीचं आहे. ढगांमुळं उपग्रह किंवा फोटो काढणारी उपकरणं काम करण बंद करतात. जेव्हा अंतराळातील ऑप्टिकल सॅटेलाइट (फोटो काढणारे उपग्रह) ढगाळ वातावरणामुळं किंवा उजेड कमी झाल्यामुळं फोटो काढणं बंद करतात, तेव्हा रडार इमेजिंग उपग्रह वापरण्यात येतो. त्यामध्ये अंतराळातून एक शक्तिशाली सूक्ष्मलहरी पाठवल्या जातात, त्या परावर्तित होतात. रडारचा उपयोग विमानं, जहाजं, मोटरगाड्या यांचं अंतर, उंची, दिशा आणि गती शोधण्यासाठी केला जातो असं राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआईटी) पाटणा येथील एक प्राध्यापक सांगतात. त्याशिवाय वातावरणात होणारे बदलही त्याच्या मदतीनं समजतात. ते रिफ्लेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स वेव्ह या तत्वावर काम करतात. रडारमध्ये सेंडर आणि रिसिव्हर अशी दोन उपकरणं असतात. सेंडर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींना टार्गेट म्हणजे लक्ष्यांच्या दिशेनं सोडतो. त्या लक्ष्यावर आदळून रिसिव्हरला मिळतात. लहरी पोहोचण्यात आणि पुन्हा मिळवण्यात किती वेळ लागला याच्याआधारावर विमानाची उंची, विमान किती अंतरावर आहे आणि वेगाची माहिती मिळते. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी आपल्याला  विज्ञान कळत नाही, असं मुलाखतीत सांगितलं. विज्ञान कळत नसेल, तर त्यांनी वैज्ञानिकांना सल्ला देण्याचं काहीच कारण नाही. तज्ज्ञ जर सल्ला देत असतील, तर तो त्यांनी मानायला हवा होता. असं असताना त्यांनी बालाकोटवर हल्ला करण्यास सांगितलं. पंतप्रधानांच्या विधानामुळं देशाच्या शास्त्रज्ञांचा अपमान झाला आहे, असं शिक्षण आणि विज्ञानक्षेत्रातील लोक म्हणत आहेत. त्यांचं विधान शास्त्रज्ञांची टर उडवल्यासारखं आहे.

भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून पंतप्रधानांचं विधान ट्वीट केलं. जेव्हा त्या विधानावर चौफेर टीका होऊ लागली, तेव्हा ते ट्वीट डिलिट करण्यात आलं. बालाकोट हल्ला झाल्यानंतर भारतीय विमानांनी पाकिस्तानी सीमेच्या बरेच अंतर आत जाऊन लक्ष्य भेदलं होतं, असा दावा सुरुवातीला करण्यात आला होता; मात्र नंतर भारतानं पाकिस्तान प्रशासित काश्मिरमध्येच हल्ला केला, असं स्पष्ट करण्यात आलं. भारतानं ज्या प्रणालीचा वापर केला त्यास ‘स्टँड ऑफ वेपन’ असं म्हटलं जातं. या प्रणालीमुळं दूर अंतरावरूनच लक्ष्य भेदलं जाऊ शकत. मिराजमध्येही ‘स्टँड ऑफ वेपन’ प्रणाली आहे. त्यामुळं ढगाळ वातावरणातही ते लक्ष्य भेदू शकतात. भारतीय मिराजला ढगांमुळं काहीच फरक पडत नाही, तर मग भारताकडं रडारपासून वाचेल असं कोणतंच लढाऊ विमान नाही का असा प्रश्‍न उरतोच. रडारपासून वाचण्यासाठी स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो किंवा विमानाला कमी उंचीवरून उड्डाण करावं लागतं. भारतीय मिराजमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान नाही. या तंत्रज्ञानामुळंच तुम्ही रडार मॅपिंगपासून वाचू शकता. स्टेल्थ तंत्रज्ञान असणारी विमानं रशिया आणि अमेरिकेकडं आहेत. रफाल विमानामध्ये हे तंत्रज्ञान नाही. भारताकडे स्टेल्थ तंत्रज्ञान असलेलं एकही विमान नाही.

मोदी यांच्या अवैज्ञानिक विधानांवरून विरोधकांनी टीका केली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मार्क्सवादी पक्षाचे सीताराम येचुरी यांनी मोदी यांच्या विधानांवरून खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य अवमानकारक आहे. त्यांनी एअरफोर्सचा अपमान केला आहे. कोणताही देशभक्त व्यक्ती असं विधान कधीच करणर नाही असं ट्विट करत येचुरी यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मोदी यांना खरमरीत टोला लगावला असून फेसबुक पोस्टद्वारे खिल्ली उडवली आहे. मोदीजींच्या या शोधामुळं जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा! अशाप्रकारची पोस्ट आव्हाड यांनी फेसबुकवर केली आहे.
ढगाळ वातावरणामुळं सर्जिकल स्ट्राईक नको म्हणणार्‍या संरक्षणतज्ज्ञांना मी सांगितलं, की ढगाळ वातावरणामुळं आपली विमानं रडारवर दिसणार नाहीत आणि शत्रूला चुकवून परत येतील. मोदींजींच्या या शोधामुळं जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! ढगात जर विमान रडारवर दिसलं नाही किंवा रेडिओ तरंग तिथं पोचलेच नाहीत तर वैमानिकांना योग्य दिशा, उंची आणि बाकीची आवश्यक माहिती सांगणार कशी? येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा! पण घाबरू नका! या सगळ्या प्रश्‍नांवर आजतकच्या अंजना ओम कश्यप (2000 च्या नोटेत चीप असणार्‍या फेम) यांनी त्यांच्याकडील जमिनीखाली 200 फुटांवरच्या नोटा शोधणारी रडार भारत सरकारला देण्याचा वायदा केलेला आहे! असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.