Breaking News

जैन संघटनेने तलावातील गाळ काढण्यासाठी पुरविले जेसीबी मशीन


पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील वडनेर हवेली येथे जैन संघटनेच्यावतीने तलावातील गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यासाठी जैन संघटनेचा गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे.

भारतीय जैन संघटनेच्यावतीने व शासनाच्या मान्यतेनुसार हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये जैन संघटना ही गाळ काढण्यासाठी मशीनचे भाडे देत आहे. व शासन त्यासाठी डिझेल पुरवत आहे. दि.10 रोजी सकाळी 11 वाजता संघटनेच्यावतीने मशीन पुरविण्यात आले. हे मशीन तलावातील संपूर्ण गाळ काढे पर्यंत असणार आहे. यावेळी संघटनेच्यावतीने यावर्षी दुष्काळ मुक्त अभियान म्हणून सुजलाम-सुफलाम हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ज्या गावांमध्ये तलावात गाळ आहे, अशा गावातील लोकांनी गाळ वाहून नेण्याची तयारी दर्शवली तर त्याठिकाणी संघटने मार्फत मशीन पुरविले जाणार आहे. त्यासाठी जैन संघटनेची मशीन पुरविण्याची तयारी असल्याचे चंदन भळगट यांनी सांगितले.

जैन संघटना अनेक दिवसांपासून सामाजिक उपक्रम राबवत आहे. गेल्यावर्षी पाणी फाउंडेशन बरोबर त्यांनी काम केले आहे. त्यावेळी प्रत्येक गावामध्ये पोकलेन मशीन संघटनेमार्फत पुरवले गेले होते. यावर्षी मात्र, ही संघटना स्वतंत्र उपक्रम राबवत आहे. गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या उपक्रमांतर्गत संघटनेमार्फत सध्या काम सुरू आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात वाढत आहे. तलावातील गाळयुक्त पोयटा हा शेतकर्‍यांनी शेत जमिनीत टाकल्यानंतर त्या शेतीचा पोत वाढण्यासाठी मदत होणार असल्याचे मनोज गांधी यांनी सांगितले. जैन संघटनेचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे वडनेर हवेली ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सुजलाम सुफलाम पारनेर तालुका अध्यक्ष चंदन भळगट, भारतीय जैन संघटना शहर अध्यक्ष मनोज गांधी, शेषमल बोरा, अरुण भंडारी, विनोद गोळे, तालुका समनवयक दीपक गर्जे, सरपंच लहुशेठ भालेकर, उपसरपंच नंदू भालेकर व वडनेर हवेली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.