Breaking News

देशात परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण शरद पवार यांचे मत; राजीव गांधी यांच्यावर टीका करणे अशोभनीय


सातारा / प्रतिनिधी ः माजी पंतप्रधान राजीव गांधी आज हयात नाहीत. गांधी  कुटुंबातील दोन व्यक्ती देशाच्या पंतप्रधान झाल्या, त्यांच्या हत्या झाल्या. एवढा मोठा त्याग त्यांनी देशासाठी केल्यानंतर त्यांच्याविषयी अशी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरणे शोभादायक नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. देशात परिवर्तनासाठीअनुकूल वातावरण असल्याता दावा त्यांनी केला. 

सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, की घटक पक्षांमध्ये एकवाक्यता निर्माण करून बहुमत कसे करता येईल याचा विचार सध्या सुरू आहे. महाराष्ट्रासह देशात चांगल्या जागा काँग्रेस महाआघाडीला मिळतील. देशातील सर्व घटक पक्षांची बैठक 21 तारखेला आयोजित केली आहे. महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी या वेळी मिळणार का,  या प्रश्‍नांवर पवार म्हणाले, “आम्ही एक बैठक आयोजित केली आहे. त्यात किती सहभागी होतील, याची मला माहिती नाही. पंतप्रधानपदाची संधी कोणत्या राज्याला मिळेल, कोणाला मिळेल हा भाग सध्या आमच्या आघाडीच्यादृष्टीने गौण आहे. प्रथम आम्हाला परिवर्तन हवे आहे. देशात परिवर्तनासाठी सोयीची अशी अनुकूल परिस्थिती दिसत आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांना एकत्र घेवून बसावे लागणार आहे. सर्वांना एकत्र आणून एकवाक्यता निर्माण करावी लागणार आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत पंतप्रधानपदी कोण, याची चर्चा केली जाणार नाही. आम्हाला पहिल्यांदा एकवाक्यता निर्माण करून बहुमत करायचे आहे. पाच वर्षे स्थिर सरकार द्यायचे आहे. पाच वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, त्या वेळी आम्हाला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये चार राष्ट्रवादी आणि दोन काँग्रेसला. या वेळी तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातील जागांचा आकडा वाढलेला दिसेल. तसेच देशातील जागाही वाढलेल्या दिसतील. काही ठिकाणी यश मिळेत; पण मताधिक्य कमी असेल.’’
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नाहीत, असा सूर सरकारने लावला आहे. यबाबत पवार म्हणाले, की राज्यात पाण्याचे संकट,  चार्‍याचा प्रश्‍न अथवा दुष्काळजन्य गंभीर परीस्थिती निर्माण होते, त्या वेळी आयोग अशा प्रश्‍नांना तातडीने परवानगी देतो, असे माझे मत आहे. आयोगाला उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती समजावून सांगितली पाहिजे. आचारसंहिता आहे म्हणून निर्णय घेण्यास विलंब लावणे योग्य नाही. दुष्काळप्रश्‍नी जे निर्णय घेतले, त्यामध्ये दुरूस्ती करण्यासाठी आम्ही पक्षाची बैठक घेतली. प्रमुख लोकांची टीम तयार केली. घेतलेल्या निर्णयामध्ये दुरूस्ती सुचविण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्यासह आणखी काहीजण गेले होते. या प्रश्‍नाचे राजकारण करायचे नाही. फक्त राज्य सरकारने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने बघावे, एवढा हेतू होता. 

दुष्काळप्रश्‍नी अवास्तव निर्णय

दुष्काळप्रश्‍नी तातडीने निर्णय घेेतले गेले पाहिजेत. जे निर्णय घेतले गेले, ते वास्तवतेपासून दूर घेतले गेले आहेत. कडब्याचे भाव खूपच वाढले आहेत. सरकार चारा छावणीतील एका जनावराला 90 ते 95 रुपये देत आहे. एवढ्या पैशात ताळमेळ कसा बसणार?. म्हणून मी यासंदर्भात भाष्य केले. महसूलमंत्र्यांवर टीका केली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.