Breaking News

‘दंतेश्‍वरी लडाके’ महिला कमांडो करणार नक्षलवाद्यांचा खात्मा


छत्तीसगड : नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सरकार आता शरण आलेल्या नक्षलवाद्यांचाच वापरणार आहे. त्यासाठी छत्तीसगड सरकारने ‘दंतेश्‍वरी लडाके’ नावाचे पहिले नक्षलविरोधी ‘महिला कमांडो’ पथक तयार केले आहे. हे पथक नक्षलग्रस्त बस्तर आणि दंतेवाडा भागात तैनात करण्यात आले आहे.

‘दंतेश्‍वरी लडाके’ पथकात 30 नक्षलविरोधी महिला कमांडो आहेत. यातील 10 महिलांनी हिंसक नक्षलवादी चळवळ सोडून आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना या नक्षलविरोधी पथकात अधिकृतरित्या समावून घेण्यात आले आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा म्हणाले, ‘दंतेश्‍वरी लडाके’ पथक हे महिला सक्षमीकरणाचे अनोखे उदाहरण आहे. इथे महिला पोलीस कमांडो पुरुष सहकार्‍यांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्या उत्कृष्ट पद्धतीने काम करतील असा मला विश्‍वास आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील नक्षलवादाविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. नुकतेच छत्तीसगड पोलिसांनी पहिल्यांदाच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डमध्येही महिला कमांडो तैनात केले आहेत. हे कमांडो नक्षलविरोधी कारवायांसाठीचे सर्वात पुढे असणारे पथक आहे. या पथकातही 30 महिलांचा समावेश असून पोलीस उपाधीक्षक दिनेश्‍वरी नाद यांच्या नेतृत्वाखाली ते तयार करण्यात आले आहे. दंतेश्‍वरी फायटर्स आणि पोलीस अधिकारी या दोघांनाही जंगलातील युद्धासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.