Breaking News

पाच वर्षात रस्त्यांसाठी 100 कोटी आणणार -खा. विखे

अहमदनगर/प्रतिनिधी
  गेल्या 3 वर्षात केंद्र सरकारच्या सेंटर रिझर्व्ह फंडातून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी मिळालेला नाही. यंदा मात्र, खासदार या नात्याने जिल्ह्यातील रस्त्यांसाठी पुढील पाच वर्षासाठी 100 कोटींचा निधी आणण्यात येणार आहे. या निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक शहराला बाह्यवळण रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खा.डॉ.विखे यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.
  खा. विखे म्हणाले की, जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पाबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. यात आरटीओ कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधकाम, जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामाची सद्यस्थिती यांचा समावेश आहे. त्यानंतर अपूर्ण असणार्‍या रस्त्यांच्या कामाची यादी तयार करण्याची सुचना खा.विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिली.
  केंद्रात नितिन गडकरी वाहतूक मंत्री असून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणे शक्य असल्याचा विश्‍वास खा. विखे यांनी व्यक्त केला. शिर्डी-मनमाडे या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग म्हणून काम करण्यात येणार आहे. तसेच नगर शहराचा बायपासचे काम विळद घाट ते नगर मनमाडपर्यंत रोडपर्यंत झाले असून पुढे अरणगावपासून रस्त्याची अवस्था वाईट आहे. त्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यासाठी 16 कोटी रुपये आले आहेत. हा रस्ता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित झालेला नाही. यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण होणार नाही. राज्य मार्गाचा राष्ट्रीय मार्ग होण्यासाठी जवळपास दीड वर्षाचा कालावधी लागतो. यासाठी येत्या केंद्रीय अधिवेशनाच्या काळात राष्ट्रीय मार्गाचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी बोलून सर्व प्रलंबित विषय त्या ठिकाणी मार्गी लावणार असल्याचे विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील प्रत्येक शहराला बायपास करण्याचा आपला प्रयत्न असून विशेष करून शेवगाव, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड या ठिकाणी राष्ट्रीय मार्ग मंजूर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून या ठिकाणी नियमाने कारवाई केली तर गरीबांना त्याचा त्रास होणार आहे. यामुळे या ठिकाणी बायपास पर्याय असून त्याचे तसेच प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मी अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे खा. विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.