Breaking News

वंचित आघाडीचे ‘ईव्हीएम’विरोधात 17 जून रोजी आंदोलन

मुंबई
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व 48 मतदारसंघांमध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यांमध्ये तफावत आढळून येते. या फरकाबाबत निवडणूक आयोगाने समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे; अन्यथा ईव्हीएम विरोधात राज्यभर आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. मात्र निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिल नसल्याने आता भारिप बहुजन महासंघाने ‘ईव्हीएम’ विरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे एक पत्रक जाहीर करून येत्या 17 जून रोजी राज्यभरातील जिल्हा आणि तालुका मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांना आंदोलन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कुठल्या जिल्ह्यातील आंदोलनाचे नेतृत्व करतील याबाबतची माहिती पक्षाकडून सांगण्यात आलेली नाही. दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) मतदान व्हावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.