Breaking News

दहा केंद्रांवर 5 हजार 91 विद्यार्थी रविवारी देणार सेटची परीक्षा

सोलापूर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, 23 जून रोजी होणार असून त्यासाठी सोलापुरातील एकूण दहा केंद्रांवर 5 हजार 91 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केल्याची माहिती येथील केंद्राचे संपर्क प्रतिनिधी तथा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांनी दिली.
रविवारी होणारी सेटची परीक्षा ही 35 वी असून सदरची परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी(गोवा) या केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात येणार आहे. सोलापूर केंद्र अंतर्गत पाच हजार 91 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केंद्र क्रमांक 20 अंतर्गत सोलापूर शहरातील संगमेश्‍वर कॉलेज, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज, वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, हिराचंद नेमचंद कॉलेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, श्री सिद्धेश्‍वर वुमेन्स पॉलिटेक्निक, एस. ई. एस. पॉलिटेक्निक, सोशल कॉलेज, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज, केगाव आणि विद्यापीठ कॅम्पसमधील संगणकशास्त्र संकुलात ही परीक्षा होणार आहे. या सेट परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असतील. पहिला पेपर सकाळी दहा ते अकरा या वेळेत व दुसरा पेपर 11.30 ते 1.30 या वेळेत होईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कक्ष खुले करण्यात येणार आहे, मात्र प्रत्यक्ष पेपर सुरू झाल्यानंतर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पहिल्या पेपरला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या पेपरसाठी बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. सदर परीक्षेसाठी प्रवेश पत्र आणणे अनिवार्य असून प्रवेश पत्राशिवाय परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षा संदर्भातील मार्गदर्शक सूचना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सेटच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अथवा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केंद्राचे संपर्क प्रतिनिधी तथा कुलसचिव प्रा. डॉ. घुटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.