Breaking News

जागरण गोंधळ कार्यक्रमाच्या जेवणातून 74 जणांना विषबाधा

बीड । प्रतिनिधीः-
जागरण गोंधळानिमित्त बकर्‍याच्या कंदुरीच्या जेवणातून  74 जणांना विषबाधा झाल्याची घटना शहरात मंगळवारी दि.11 रोजी रात्री घडली आहे. जेवणानंतर अनेकांना उलटी, मळमळणे असा त्रास झाला होता. हे लक्षात येताच या सर्वांना तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  यात 14 लहान मुलांचा समावेश असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे व काही रुग्णांना उपचार करून सुट्टी देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.
शहरातील धानोरा रोड भागातील रहिवासी बाबासाहेब गोखले यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांना निमंत्रण देऊन त्यांनी बोलावले होते. त्यांच्यासाठी खास कंदूरीचा बेत आखला होता. सर्वांनी रात्री उशिरापर्यंत जेवण घेतले. जेवणानंतर काही तास होताच सर्वांना मळमळ, उलटी, संडासचा त्रास सुरू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मिळेल त्या वाहनाने तातडीने सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाता पहाता रुग्णांची संख्या 74 वर गेली, जिल्हा रुग्णालयात एकच धावपळ उडाली. रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत सर्व रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात आल्यानंतर सकाळी सर्वांची प्रकृती स्थिर झाली. विषबाधा झालेल्या 36 जणांवर वार्ड क्रमांक 6 मध्ये तर 23 जणांवर वार्ड क्रमांक 8 मध्ये उपचार सुरू करण्यात आले, तर वॉर्ड क्रमांक 9 मध्ये 15 जणांवर उपचार सुरू आहेत. पहाटे 3 वाजता अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे यांच्यासह अन्न निरीक्षक ऋषिकेश मरेवार व कर्मचार्‍यांनी रूग्णालयाला भेट दिली. सर्वाना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले. त्यानंतर अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.आज सकाळी प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. विषबाधा झालेल्यामध्ये प्रमोद ससाने, क्रांती गायकवाड, स्वाती शिंदे, भाऊराव कोठुळे, संतोष खंडागळे, विकास नरवडे, रेणुका सूर्यवंशी, अनिकेत कवळे, श्रीराम वराट, शुभम वाकडे, राधा नजान, गणेश कोठुळे, अविनाश शिंगनाथ, बळीराम वराट, अक्षरा वाघमारे, विमल वडमारे, स्वाती वडमारे, भास्कर वडमारे, आसाराम जाधव श्रावणी जाधव, भाग्यश्री जाधव, प्रतीक्षा जाधव, वशिशष्ट जाधव, इंगद्रजीत बाळकृष्ण आगलावे, राजेंद्र वायकर, राणी गणेश मस्के,  राम कवर, भोळे आनंद, शिंदे शिवानी, वाकडे लोंढे यांच्या सह 74 जणांचा समावेश आहे.