Breaking News

बिहारमध्ये ‘चमकी’ तापाचे थैमान, 84 मुलांचा मृत्यू

मुजफ्फरपूर
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये थैमान घातलेल्या चमकी तापामुळे (अ‍ॅक्युट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) आतापर्यंत 84 लहान मुलांचा मृत्यू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन बिहार दौर्‍यावर पोहोचले असून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. उपचार घेत असलेल्या मुलांची विचारपूस करीत असताना हर्षवर्धन यांच्यासमोर एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शनिवारी रात्रीपर्यंत 80 मुलांचा मृत्यू झाला होता; परंतु आज सकाळी पुन्हा चार मुलांचा मृत्यू झाल्याने ही संख्या 84 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंर्त्री डॉ. हर्षवर्धन यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार सुरू असलेल्या मुलांची विचारपूस केली. हर्षवर्धन यांनी श्रीकृष्णा मेडिकल कॉलेज आणि अन्य काही हॉस्पिटलचा दौरा केला. या वेळी त्यांनी मुलांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी चर्चा केली. तापाच्या साथीमुळे तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष पथक मुजफ्फरपूरमध्ये दाखल आहे. सदर भागातील उष्णतेच्या लाटेमुळे हा आजार मुलांना होत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे, तर चमकी तापामुळे होणारे मृत्यू लिचीमुळे होत आहेत, अशी बाब काही अहवालांमध्ये नोंद करण्यात आली आहे. मुजफ्फरपूर लगत घेतल्या जाणार्‍या लिचीच्या उत्पादनात काही विषारी घटक असल्याचे बोलले जात आहे.

चमकी तापामुळे वाढत चाललेल्या मृतांच्या आकड्याबाबत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे. या परिस्थितीवर योग्य लक्ष ठेवण्याच्या सूचनाही नितीशकुमार यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत.