Breaking News

गावातल्या लोकांसमोर मारहाण;अपमान जिव्हारी लागल्याने एकाची आत्महत्या

अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा येथील घटना;तिघांविरोधात तक्रार

अंबाजोगाई । प्रतिनिधीः-
गावातील लोकांसमोर मारहाण केल्यामुळे झालेला अपमान जिव्हारी लागल्याने ऊसतोड मजुराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा येथे घडली. याप्रकरणी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ङ्गगणेश भीमराव राठोड (वय 35, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. गणेशची पत्नी सुनिता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सकाळी 9 वाजता गावातील सुरेश तुकाराम पवार याने आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून गणेशला गावातील लोकांसमोर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि  सुरेशचे वडील तुकाराम पवार आणि आई यशोदाबाई पवार यांनी अश्‍लील शिवीगाळ करत मारहाण करण्यासाठी गणेशच्या अंगावर धावून गेले. यावेळी गणेशच्या पत्नीने आणि आई सखुबाई यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले आणि त्याला घरी घेऊन गेले. परंतु, गावातील लोकांसमोर झालेला अपमान गणेशच्या जिव्हारी लागल्याने तो अस्वस्थ झाला होता. त्याच मन:स्थितीत तो घरातून बाहेर पडला आणि दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास त्याने बर्दापूर पोलीस ठाण्याच्या जवळ रोडवर विषारी औषध प्राशन केले. ठाण्यात उपस्थित कर्मचार्‍यांनी तातडीने गणेशला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी दुपारी एक वाजता गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सुनिता सुरेश पवार, तुकाराम पवार आणि यशोदाबाई पवार या तिघांवर गणेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बर्दापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

बर्दापूर पोलिसांची तत्परता
पोलीस ठाण्याच्या जवळच गणेशने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी तातडीने त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गणेशच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक संतप्त झाल्याने स्वाराती रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बर्दापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्‍वासन देऊनही उशिरापर्यंत वातावरण निवळले नव्हते. 

कुटुंबाची वाताहत
गणेश घरातील कमावता तरुण होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. आधीच हलाखीच्या परिस्थितीत दिवस कंठत असलेले हे कुटुंब गणेशच्या मृत्यूमुळे उघड्यावर आले आहे. पाच लहान्या लेकरांसह संसार कसा चालवायचा हा यक्ष प्रश्‍न गणेशच्या पत्नीसमोर आहे.