Breaking News

दुखापतीमुळे शिखर धवन विश्‍वचषकातून बाहेर

लंडन
भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा डावखुरा फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळे पुढील 3 आठवडे खेळू शकणार नाही. शिखरच्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याने डॉक्टरांनी त्याला 3 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलिया विरोधातील सामन्यात दमदार शतक ठोकणार्‍या शिखरच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला हादरा बसला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नॅथन कोल्टर - नाइलचा चेंडू धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. यामुळे धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा क्षेत्ररक्षणासाठी आला होता. आता धवनला दुखापत झाल्याने सलामीला रोहित शर्मासोबत कोण येणार, असा प्रश्‍न टीम इंडियासमोर निर्माण झाला आहे. भारताच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या 15 खेळाडूंच्या संघात एकूण 3 डावखुरे फलंदाज आहेत. त्यापैकी सध्याच्या अंतिम 11 च्या संघात 2 फलंदाज खेळत असून त्यातही एक फलंदाज हा कुलदीप यादव आहे. त्याला फलंदाजीचा फारसा अनुभव नाही.  याशिवाय राखीव 4 खेळाडूंमध्ये रवींद्र जाडेजा हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. पण जाडेजा हा सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणारा खेळाडू आहे. अशा परिस्थितीत पहिल्या 6 फलंदाजांमध्ये असलेला समतोल कायम ठेवण्यासाठी डावखुर्‍या फलंदाजाच्या जागी डावखुरा फलंदाज म्हणून ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या भारतीय संघातील समावेशाबाबत चर्चेला उधाण आलेय. दरम्यान यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
धवनच्या पूर्वी दक्षिण अफ्रिकेचा स्टार जलद गोलंदाज डेल स्टेन खाद्याला दुखापत झाल्याने विश्‍वचषकातून बाहेर झाला आहे. विश्‍वचषकात स्टेन एकही सामना खेळू शकलेला नाही. यंदाच्या विश्‍वचषकात दक्षिण अफ्रिकेची कामगिरी निराशजनक ठरत आहे. कारण आत्तापर्यंत झालेल्या चार सामन्यात द. अफ्रिकेला एकही सामना जिंकता आलेला नाही. तर अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर मोहम्मद शहजाद हा खेळाडूदेखील  विश्‍वचषकातून बाहेर पडला आहे.  अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने गुडघ्याच्या दुखापतीचे कारण देत मोहम्मद शहजादला बाहेरचा रस्ता दाखवला. पण या घटनेला वेगळे वळण लागले आहे. माझ्या विरूद्ध कट रचला असल्याचा गंभीर आरोप शहजादने अफगानिस्तान क्रिकेट बोर्डावर केला आहे. त्याची प्रकृती ठीक होती मात्र दुखापतीचे कारण देत  संघातून त्याला बाहेर काढले आहे.


सलामीचा पेच
ऋषभ पंत, अंबाती रायुडू, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे शिखर धवनऐवजी टीममध्ये निवड होण्यासाठीचे दावेदार आहेत. हे सगळे खेळाडू ओपनर नसले तरी आता रोहित शर्मासोबत केएल राहुल ओपनिंगला येईल. आणि चौथ्या क्रमांकासाठी या खेळाडूंचा विचार होण्याची शक्यता आहे. 15 एप्रिलला टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठीच्या टीमची घोषणा केली होती. तेव्हा निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू यांची नावं घेतली होती. त्यामुळे या दोघांपैकी एकाचीच निवड होण्याची शक्यता जास्त आहे. मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांना इंग्लंडमध्ये भारत ए कडून खेळण्याचा अनुभव आहे. जर यांच्यापैकी एकाची निवड झाली तर ते थेट रोहित शर्मासोबत ओपनिंगला येतील. तर अजिंक्य रहाणे हा सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे.