Breaking News

राज्यातील वाघांच्या संख्येत वाढ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई/ प्रतिनिधी ।
राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. राज्यातील वनक्षेत्रांत 2014 मध्ये 204 वाघ होते. आता ही संख्या 250 इतकी झाली आहे. 20 टक्के इतकी ही वाढ असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दोन वर्षांखालील वाघाच्या बछड्यांची संख्या 250 इतकी असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत वाघांच्या संरक्षण तसेच संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. त्यांना आता यश मिळायला लागले आहे. केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी महाराष्ट्रात आता पूर्ण वाढ झालेले 250 वाघ आहेत. 2014 साली हीच संख्या 204 इतकी होती. वाघांच्या संख्येत 20 टक्के वाढ झाली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. बिबट्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वन्यप्राणी-मानव संघर्ष होऊ नये, यासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.चार वर्षे पूर्ण झालेल्या वाघाचीच गणना करण्यात येते; पण राज्यात दोन वर्षांखालील वाघाच्या बछड्यांची संख्या 250 इतकी आहे. वाघाच्या जन्माला आलेल्या बछड्यांची ’लाईफ एक्स्पेक्टन्सी’ 50 टक्के असते. म्हणजेच एकूण जन्माला आलेल्या बछड्यांपैकी पन्नास टक्के बछडे पूर्ण आयुष्य जगतात. त्यामुळे बछड्यांची वाढलेली संख्या देखील आनंदाची बातमी असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.