Breaking News

वार्शी येथे वीज उपकेंद्रासाठी ऊर्जा मंत्र्यांना निवेदन ;प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला दिले आदेश

देवळा  (वार्ताहर )
वार्शी ता.  देवळा येथे वीज उपकेंद्र उभारण्यात यावे ,या मागणीसाठी आ.  डॉ राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ऊर्जा राज्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले . निवेदनाचा आशय असा की , देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील वार्शी येथे खर्डे येथील वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येत आहे . मात्र , शेती पंपाच्या कमी दाबाच्या विजपुरवठ्यामळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली  आहे . कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी मिळत नसल्याने ,उत्पन्नात घट होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागत  असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . खर्डे वीज उपकेंद्रातून खर्डेसह ,कांचने ,हनुमंतपाडा (गावठाण ), वाजगांव व शिवशी या गावांना वीजपुरवठा करण्यात येतो . हनुमंतपाडा फिडर मधून वार्शी गावाला वीजपुरवठा करण्यात येत असून , तो अनियमित व कमी दाबाचा असल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरु करण्यात यावे ,अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे . दि . १२ रोजी मुंबईत  आ .डॉ . राहुल आहेर यांच्या  उपस्थितीत वार्शी येथील शिष्टमंडळाने ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन नवीन वीज उपकेंद्रासाठी निवेदन सादर केले . यावेळी मंत्री बावनकुळे यांनी आदिवासी उपाययोजना अंतर्गत त्वरित प्रस्ताव पाठवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले . हि मागणी येथील ग्रामस्थांची लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे . या शिष्टमंडळात वार्शी विकास सोसायटीचे चेअरमन विजय सोनवणे , हेमराज सोनवणे , भाऊसाहेब सोनवणे , ललित सोनवणे , परशराम पवार आदीशेतकरी  उपस्थित होते .   फोटो ओळ - वार्शी ता.  देवळा येथे नवीन वीज उपकेंद्रासाठी ना .  चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देतांना आ . डॉ . राहुल आहेर समवेत  विजय सोनवणे , भाऊसाहेब सोनवणे ,हेमराज सोनवणे , ललित सोनवणे आदी .