Breaking News

खा. जलील यांच्या अभिनंदन ठरावावरून राडा

औरंगाबाद महापालिका सर्वसाधारण सभा; सहा नगरसेवक निलंबित

औरंगाबाद / प्रतिनिधी
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करा, या ‘एमआयएम’च्या मागणीवरून महापालिकेच्या सभेत गुरूवारी (13 जून) राडा झाला. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी गोंधळ घालणार्‍या ‘एमआयएम’च्या सहा नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित केले; मात्र ‘एमआयएम’च्या सर्व नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन करीत मोठा गोंधळ घातला. नगरसेवक सुरक्षा रक्षकांनाही दाद देईनात, म्हणून शेवटी पोलिसांना सभागृहात पाचारण करण्याची वेळ आली. त्यातच महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले आहे.

एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहात आल्यानंतर लगेच खा. जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्याची मागणी केली. त्यावर महापौर घोडेले यांनी, ‘तुम्ही सभागृहात उशिरा आला आहात, सभा सुरू होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला आहे’ असे ‘एमआयएम’च्या नगरसेवकांना सांगितले; मात्र ‘एमआयएम’चे नगरसेवक जलील यांच्या नावाने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याचा मुद्दा लावून धरत होते. महापौर ऐकत नाही, हे पाहता त्यांनी महापौरांविरुद्ध घोषणाबाजीही सुरू केली. त्यामुळे सभागृहात आणखीनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे महापौरांनी ‘एमआयएम’च्या सहा नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केल्याची घोषणा केली.

या प्रकारामुळे सभागृहात उपस्थित ‘एमआयएम’चे सर्व नगरसेवक महापौरांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जमा झाले व ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यावर महापौरांनी सुरक्षा रक्षकांना आदेश देत निलंबित केलेल्या नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यास सांगितले. ‘एमआयएम’चे नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर घेऊन जाणे सुरक्षा रक्षकांना अशक्य झाले. त्यामुळे महापौरांनी पोलिसांना सभागृहात पाचारण केले. त्यामुळे आणखी गोंधळ वाढला व नगरसेवकांनी ‘महापौर हाय हाय’च्या घोषणा सुरू केल्या, तर शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी ‘महापौर जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा सुरू केल्या. या गदारोळात महापौरांनी सभागृहात कामकाज तूर्त तहकूब केले असून, सहाय्यक पोलिस आयुक्त आपल्या फौजफाट्यासह सभागृहात दाखल झाले.