Breaking News

राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याचे काम निकृष्ट

कामाच्या चौकशीची आरपीआयची मागणी, रास्तारोकोचा इशारा


राहुरी/ प्रतिनिधी
राहुरी ते शनिशिंगणापूर या १११ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या सुरू असलेले काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे साडेसातीच्या फेऱ्यात अडकले आहे. मोठ्या प्रमाणात निधी येऊनही या रस्त्याचे  काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी व्हावी अन्यथा रास्तारोको करण्यात येईल असा इशारा  राहुरी तालुका आरपीआयच्या वतिने अध्यक्ष विलास साळवे यांनी दिला आहे.

सदर रस्ता अनेक ठिकाणी खोदून डागडुजी करण्यात आली आहे. याप्रकारे सुरू असलेल्या कामाकडे वरिष्ठ प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मागील महिन्यात सिमेंटच्या रस्त्याला डांबराची ठिगळं दिल्यानंतर अल्पावधीतच हे डांबर निघण्यास सुरुवात झाली आहे. शिंगणापूर ते सोनई तसेच ब्राम्हणी ते गोटुंबा आखाडा पर्यत रस्त्याच्या कामात निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरण्याचे काम सुरु आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या शनिभक्तांच्या  वाढत्या तक्रारीनंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याकरीता एकशे अकरा कोटींचा निधी मंजूर झाला. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यापासून कामाच्या दर्जाबाबत नाराजीचा सूर आहे . ठेकेदाराने पंढरपूरच्या सिमेंट रस्त्याचे काम पाहूनच हे काम करावे अशी मागणी राहुरी, पिप्री अवघड, गोटुबा आखाडा, ब्राम्हणी व उंबरे येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या राहुरीच्या गोटुबा आखाडा पर्यत काम आले आहे. हे कामही अतिशय संथ गतीने सुरु आहे. मजबुतीकरण  काम घाईत उरकले जात असून कामावर पाणी मारण्याचे प्रमाणही कमीच आहे. अशी माहिती साळवे यांनी दिली.  सोनई ते शिंगणापूर पूर्ण दक्षिण बाजूचा रस्ता तोडून दर्जेदार व फक्त सिंमेटचाच रस्ता करावा अन्यथा रास्ता रोको अंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.