Breaking News

भाजपाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

‘जय श्रीराम’च्या घोषणा देत आंदोलकांकडून राज्य सरकारचा निषेध; परिस्थिती चिघळली


कोलकात्ता
पश्‍चिम बंगालमध्ये आज भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. राज्य सरकारचा निषेध करत बिपीन बिहारी गांगुली मार्गावरून लाल बाजारच्या दिशेने निघालेल्या व आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या. शिवाय पाण्याचे फवारेदेखील सोडले. त्यामुळे येथील परिस्थिती अधिकच चिघळली. आंदोलक हातात भाजपचा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ ही घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करीत होते.

भाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाल बाजार परिसरातील पोलिस मुख्यालायास घेराव घातला होता. आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास एक लाख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिस मुख्यलयाबाहेर भाजपचा झेंडा फडकवत असणार्‍या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपच्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली होती. कोलकात्ता शिवाय हावडा व सियालदह येथेदेखील भाजपच्यावतीने राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्‍चिम बंगालमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्यापही थांबवण्याचे नाव घेत नाही. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बॅनर्जी स्वत: राज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी त्या पश्‍चिम बंगाल पोलिस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घेत आहेत. तसेच आरोपींचा रोहिंग्याशी संबंध असून ते त्यांचा संपर्कात आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. तृणमूल काँग्रेसनेही भाजपने आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. सुप्रियो यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यूला बॅनर्जी यांना जबाबदार ठरवले आहे. ममता यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना भाषणातून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्यासाठी उकसवले जात असल्याचा आरोप केला होता.

अटक न करण्यासाठी ममतांचा पोलिसांवर दबाव
दरम्यान, रॉय यांनी नुकतीच भंगीपाडा गावात जाऊन हिंसाचारात मृत्यू झालेल्या प्रदीप मंडल आणि सुकांत मंडल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या हिंसाचाराला ममता याच जबाबदार असून त्यांच्या आदेशामुळेच पोलिस या प्रकरणातील आरोपींना अटक करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला.