Breaking News

राज्यात पुन्हा आघाडीचाच झेंडा : आ.थोरात

राहाता/ प्रतिनिधी
 काँग्रेसचे तत्त्वज्ञान शाश्वत आहे. काँग्रेसला संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळे कोणत्याही लाटेने काँग्रेस संपणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी एकजुटीने आगामी विधानसभा निवडणूक लढवेल आणि राज्यात  परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी राहता येथे बोलताना व्यक्त केला.

   राहता येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे , आ.भाऊसाहेब कांबळे, डॉ.एकनाथ गोंदकर , सुधीर म्हस्के , बाळासाहेब केरू विखे, सिमोन जगताप , विक्रम दंडवते , विजय जगताप , एकनाथराव घोगरे, सदाशिव वरपे ,सुभाष निर्मळ ,रमेश घागरे , श्रीकांत मापारी ,रावसाहेब मोठे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

   यावेळी बोलताना  थोरात म्हणाले, जिल्ह्याच्या जोडीने राज्यातही आघाडीला नेत्रदीपक यश मिळेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये परस्परविरोधी निकाल लागल्याचा आजवरचा इतिहास आहे. 1999 पासूनच्या निवडणुकांत सातत्याने असेच घडत आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये विजयाची क्षमता व जन-सामान्यांशी बांधिलकी असलेले उमेदवार उभे करणार आहे. राहाता मतदारसंघातही सर्वानुमते येत्या विधानसभा निवडणुकीत चांगला उमेदवार देऊ आणि परिवर्तन घडवू, असेही थोरात यांनी सांगितले.