Breaking News

मॉन्सून महाराष्ट्राच्या वेशीवर

मुंबई / प्रतिनिधी
‘वायू’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीचे परिणाम पाहता महाराष्ट्रात येणार्‍या मॉन्सूनच्या वाटचालीक मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. मॉन्सूमपूर्व सरींनी सध्या राज्यासह अनेक ठिकाणी हवेत गारवा आला असला, तरीही यंदाच्या मोसमातील मॉन्सून मात्र लांबणीवर गेला होता; परंतु अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मॉन्सून अखेर महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे.

कर्नाटकच्या मंगळुरूपर्यंत मॉन्सून सक्रिय झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. येत्या एक ते दोन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातल्या कोकण, मुंबई आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. ‘वायू’ वादळामुळे लांबणीवर गेलेला मॉन्सून आता खर्‍या अर्थाने सक्रिय झाला असून तो आता महाराष्ट्रही व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणात अजून मॉन्सून दाखल झाला नसला, तरी मॉन्सूनपूर्व पावसाने कोकणात चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोकणात भात पेरणी सुरू झाली आहे. भाताच्या या पेरणीला कोकणात तरवा म्हटले जाते. हा तरवा नंतर काढून त्या रोपांची लावणी केली जाते. सध्या कोकणात सर्वत्र अशा प्रकारे तरवा पेरला जात आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकरी सुखावला आहे. लवकरच मॉन्सून दाखल होईल आणि शेतीची कामेही वेगात सुरू होतील.