Breaking News

योगी सरकारला सर्वोच्च दणका!

पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या सुटकेचे आदेश

नवीदिल्ली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईवर न्यायालयाने प्रश्‍न उपस्थित केले. ही कारवाई कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली, असा सवाल न्यायालयाने केला.
कनोजिया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश देत हा खटला सुरू राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कनोजिया यांनी ‘सोशल मीडिया’वर जे शेअर केले, ते करायला नको होते, असे फार तर आपण म्हणू शकतो; मात्र त्यांना अटक करण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल न्यायालयाने केला. सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उत्तर प्रदेश सरकारला आठवण करून दिली.
नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनोजिया यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये एक महिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहे. ती म्हणते, की तिने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे. कनोजिया यांनी हा व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शुक्रवारी रात्री लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हजरतगंज पोलिसांनी दिल्लीतील निवासस्थानाहून कनोजिया यांना अटक केली होती.

या अटकेविरोधात प्रशांत यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्लीतील घरी साध्या वेशात काही लोक आले आणि त्यांनी कुठलेही वॉरंट किंवा दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत न दाखवता प्रशांत यांना अटक केली आणि ट्रान्झिट रिमांड न घेता उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना नेले, असे प्रशांतची पत्नी जिगीशा अरोरा यांनी याचिकेत म्हटले होते. त्याची दखल घेत उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका देत कनोजिया यांच्या सुटकेचे आदेश दिले.