Breaking News

काही रेल्वे मार्गांचे खासगीकरण

मुंबई / प्रतिनिधी
देशातील काही रेल्वे मार्गांवर खासगी कंपन्यांच्या रेल्वे धावणार आहेत. काही मार्गांवरील रेल्वे सेवांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयावर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. कमी गर्दीच्या आणि पर्यटन मार्गांवर खासगी रेल्वे सेवा पुरवण्यासाठी आगामी 100 दिवसांमध्ये निविदा काढण्यात येणार आहेत.

बिबेक देबरॉय समितीने 2015मध्ये सादर केलेल्या अहवालात भारतीय रेल्वेत अनेक बदल करण्याचे सुचवले होते. या समितीच्या अहवालात रेल्वे वाहतुकीत खासगी कंपन्यांचा समावेश करावा आणि रेल्वे बजेट बंद करावे, अशीही शिफारस करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे बंद केले असून केंद्रीय अर्थसंकल्पात त्याचे विलनीकरण करण्यात आले. सुरुवातीला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन(आयआरसीटीसी) या रेल्वेच्याच कंपनीला दोन रेल्वे सेवांच्या संचालनाची जबाबदारी ठराविक रकमेच्या बदल्यात प्रायोगिक तत्त्वावर देण्यात येणार आहे. ही ट्रेन मोठी शहरे एकमेकांशी जोडत सुवर्ण चतुष्कोण मार्गांवरून धावेल. रेल्वे गाड्यांची जबाबदीरीही ‘आयआरसीटीसी’लाच देण्यात येणार आहे. यासाठी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनला आयआरसीटीसी शुल्क अदा करणार आहे. या अनुभवाच्या आधारे प्रवासी रेल्वे वाहतुकीत गुंतवणूक करू इच्छिणार्‍या खासगी कंपन्यांनाकडे विचारणा करण्यात येईल.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रावरून ही बाब समोर आली आहे. रेल्वे मार्गांचे खासगीकरण करण्यापूर्वी कामगार संघटनांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


रेल्वे तिकीटावरील सबसिडी सोडण्याचे आवाहन
गॅस अनुदानाप्रमाणे रेल्वे तिकीटावरील अनुदान सोडण्याचे आवाहन रेल्वेतून करण्यात येणार आहे. यासाठी मोठी मोहीम चालू करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करणार आहे. रेल्वे तिकीट बुक करतानाही सबसिडी सोडण्याचा पर्याय प्रवाशांसमोर असणार आहे.