Breaking News

देवळ्याच्या आठवडे बाजारात चोरींचे प्रमाण वाढले

देवळा ( वार्ताहर ) 
येथील आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेवून रविवार (ता.९) रोजी मोटारसायकल व मोबाईल चोरी गेल्याने आणि रविवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी चोरींचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
          येथील आठवडे बाजार दर रविवारी भरतो. भाजीपाला खरेदी करण्याच्या नादात असलेल्यांचा व बाजारातील गर्दीचा हे चोरटे फायदा उठवतात व हातोहात मोबाईल पळवतात. तर हँडललॉक तोडून मोटारसायकल चोरून नेतात. या रविवारी (ता.९) रोजी येथील प्राथमिक शिक्षक पी.के.आहेर यांच्या खिशातील मोबाईलची चोरी झाली. वरच्या खिशातील अँड्रॉइड मोबाईल खिशाच्या वर स्पष्ट दिसतो व याचा फायदा हे चोरटे घेतात. विशेष म्हणजे श्री.आहेर यांचा असाच एक महागडा मोबाईल सहा महिन्यांपूर्वी याच बाजारातून चोरीला गेला असून आज पुन्हा तसाच प्रकार घडल्याने त्यांनी या चोरीच्या वाढत्या प्रमानाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच माळवाडी ता.देवळा येथील जिभाऊ मोतीराम बच्छाव यांची पॅशन-प्रो मोटारसायकल ( एम.एच.४१ क्यू ३०४३) पाच कंदील ते बसस्थानक दरम्यानच्या धक्क्याच्या जागेवर लावलेली असतांना व श्री.बच्छाव हे किरकोळ बाजार करण्यासाठी गेले असता काही वेळातच या मोटारसायकलीची चोरी झाली. या रविवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकावरही प्रवाशांची पाकिटमारी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील प्रत्येक बाजारांच्या दिवशी असेच मोबाईल चोरीचे प्रकार घडल्याने व हे प्रमाण आता वाढू लागल्याने मोबाईलधारक बाजारात मोबाईल घेवून जायला कचरू लागले आहेत. विशेष म्हणजे या मोबाईल चोरीची झळ बहुतांश जणांना बाजाराच्या दिवशी आठवडे बाजारातच बसत आहे. पोलिसांनी या मोबाईल चोरांचा छडा लावत त्यांना चांगलीच अद्दल घडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.