Breaking News

मोदींवर अण्णा नाराज, फडणवीसांवर खूश

हजारे यांच्या पत्राला केंद्राकडून केराची टोपली; चुका झाल्यास देवेंद्रानाही सुनावू


पुणे / प्रतिनिधी
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारचे काम चांगले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविषयीची नाराजी व्यक्त केली, तर मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारताना ते चुकले, तर त्यांचेही कान धरू, असा इशारा दिला.

पुण्यातील यशदा येथे नवीन लोकायुक्त कायदा बनवण्यासंदर्भात हजारे यांची राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्या समवेत बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, की मी जनतेच्या हक्कांसाठी मोदी सरकारकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून न्याय मागितला; मात्र माझ्या पत्रव्यवहाराची मोदी सरकारने दखल घेतली नाही. असे असले, तरीही आपण आपले काम करत राहायचे ही माझी पद्धत आहे. केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करताना मोदी सरकारपेक्षा फडणवीस सरकारचे काम निश्‍चित चांगले आहे, हे सांगताना त्याचे कारण ही हजारे यांनी दिले. राज्य सरकारने दखल घेत लोकायुक्त कायदा करण्यासाठी 10 जणांची समिती नेमली आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले.
लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी अनेक वेळा केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला; पण त्याबाबत दखल घेतली गेली नाही. त्या प्रश्‍नावर त्यांनी भूमिका मांडली. या वेळी हजारे म्हणाले, की केंद्र सरकारकडून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी झाली; पण त्यानंतर लोकायुक्त कायद्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. त्यासाठी आंदोलनाचे अस्त्र उगारताच राज्य सरकारकडून लोकायुक्त कायद्यासाठी समिती नेमली असून त्या कामाला सुरुवात होणार आहे. लोकायुक्त कायदा हा क्रांतिकारी ठरणारा आहे. माहिती अधिकाराचा फायदा शेवटच्या घटकाला झाला आहे, असे हजारे यांनी सांगितले आहे.