Breaking News

राज्य मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार

मुंबई / प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा 14 जूनला विस्तार केला जाणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुनगंटीवार म्हणाले होते. शिवसेना आणि मित्र पक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूतोवाच मुनगंटीवारांनी केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शाह यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी खातेविस्तार आणि बदल होण्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात आली होती. रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाचीही नियुक्ती केली जाणार असून त्याबाबतही फडणवीस आणि शाह यांच्या बैठकीत बोलणी झाली होती.

दिल्लीत 9 जून रोजी भाजपची महत्त्वाची बैठक झाली. या वेळी मंत्रिमंडळ, पक्षाध्यक्ष, दुष्काळ आदी मुद्दयांवर सविस्तर चर्चा झाली. फडणवीस यांनी शाह यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली होती. केंद्राने राज्याच्या मागणीनुसार दुष्काळनिधी दिलेला आहे. वास्तविक फडणवीस यांची शाह यांच्याशी झालेली भेट ही शुक्रवारी मुंबईत भाजपच्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर झालेली. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्यास असल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्याही नावाची चर्चा चालू आहे. प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यांचे गृहनिर्माण हे खाते कुणाकडे जाते, याकडे लक्ष लागले आहे.