Breaking News

पोलीस अधिकारी सय्यद यांच्या कार्याचा पंचवटीकरांतर्फे यथोचित गौरव...

कुंभमेळयाच्या अनुभवाबाबत पुस्तक प्रकाशित व्हावे – आ.बाळासाहेब सानप.

 नाशिक 
 एखादा सनदी किंवा उच्चस्तरीय अधिकारी निवृत्त झाला की त्याच्या सेवापूर्ती सोहोळ्यात सर्वजण स्वतःला झोकून देतांना आपण बघितले असेल मात्र सहाय्यक पोलीस दर्जाचा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर एखाद्या बंद खोलीत आणि फार फार तर 25 ते 30 लोकांच्या सानिध्यात त्याचा सत्कार झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र एएसआय सय्यद मुझ्झफर अन्वर यांच्या सेवपूर्तीनिमित्त झालेल्या नागरी सत्कार सोहोळयास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ अधिकारी,आमदार, महापौरांसह अनेक पुढारी आणि दोन ते तीन हजारांचा जनसमुदाय हे सारे स्वप्नवत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात उतरले आहे.
               दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे सुद्धा हा सोहोळा बघून अचंबित झाले आणि आपल्या भाषणात त्यांनी ही गोष्ट बोलून दाखविली. पोलीस आणि नागरिक यांचे विळ्या -भोपळ्याचे नाते असल्याची उदाहरणे आपणास माहिती आहेत. परंतु पोलीस दलात सामिल झाल्यानंतर आपल्या आयुष्याची बहुमोल 39 वर्षे सेवा करतांना समता, बंधुता, शांतता आणि सलोख्याचा कानमंत्र देऊन नाशिककर आणि विशेषतः पंचवटीकरांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजविणारे   सय्यद मुझ्झफर अन्वर सारखे अधिकारी दुर्मिळच ! चार कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाची जबाबदारी त्यांनी पार  पाडली आणि ते होते म्हणून मी निश्चिन्त होतो, असे उद्दगार नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानप यांनी काढले त्यावेळी सय्यद यांनी नाशिककर जनतेची किती कार्यतत्पर आणि तन्मयतेने सेवा केली याची साक्ष पटते. सिंहस्थाच्या काळात आलेल्या अनुभवावर आधारित एखादे पुस्तक प्रकाशित करावे अशी सूचनाही आ.सानप यांनी करताच सय्यद यांनी त्यास तत्काळ होकार दिला.
                कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर पाटील, भाजपाचे महानगर सरचिटणीस उत्तमराव उगले, अनिल वाघ, सचिन डोंगरे, प्राचार्य हरिष आडके यांनीही आपले अनुभव कथन केले. सय्यद यांच्या शिक्षक कन्येने आपल्या पित्याची महती सांगितली तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले होते.ज्येष्ठ साधू, संत, महंत, पंचवटी परिसरातील बहुसंख्य नगरसेवक आणि नागरिक तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, संजय बागुल यांच्यासह सय्यद यांच्या काळातील  समकालीन अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. पंचवटी शांतता समिती तसेच पंचवटीचे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक मच्छिन्द्र सानप, जगदीश पाटील, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, धनंजय पुजारी यांच्यासह शांतता समितीच्या सदस्यांनी  विशेष परिश्रम घेतले. सरकारास उत्तर देतांना सय्यद खूपच भावूक झाले होते.नाशिककरांनी माझ्यावर खूप प्रेम केले. मी निष्ठेने काम केले आणि आजचा सत्कार म्हणजे त्या कामाची पावती असल्याचे सांगत त्यांनी सतत प्रत्येक कामात मदत करणारे आ.बाळासाहेब सानप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. असा लोकप्रतिनिधी सर्व मतदार संघाला लाभल्यास राज्याचे आणि देशाचे कल्याण होईल, असेही ते पुढे म्हणाले.