Breaking News

अंबाजोगाईत साडेतीन लाखांचा गुटखा पकडला

अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या विशेष पथकाची कारवाई

अंबाजोगाई । प्रतिनिधीः-
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या विशेष पथकाने सोमवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरात एका जीपमधून 3 लाख 36 हजारांचा गुटखा जप्त केला. यावेळी चारचाकी वाहनासह चालकास ताब्यात घेऊन अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा एका जीपमधून केजकडून अंबाजोगाई शहरात येत असल्याची गुप्त माहिती सोमवारी बोर्‍हाडे यांच्या विशेष पथकास मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे या पथकाने पाण्याची टाकी परिसरात सापळा रचला. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास माहिती मिळालेली पांढर्‍या रंगाची महिंद्र झायलो (एमएच 12 केएन 1554) आलेली दिसताच पोलिसांनी त्यास अडविले. गाडीची झडती घेतली असता आतमध्ये सुमारे 3 लाख 36 हजार रुपये किमितीचे एक्का कंपनीच्या गुटख्याच्या एकूण 32 गोण्या आणि 20 पुडे आढळून आले. सदर वाहनाचा चालक शेख शाहेबाज फारूक (रा. फुले नगर, केज) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुटखा कुठून आणला आणि कुठे देणार होता याबाबत चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिल्याने पथकाने त्याच्याकडील मोबाईल जप्त केला. यावेळी पोलिसांनी गुटखा आणि चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण 8 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला असून चालक शेख शाहेबाज याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकार्‍यांनी अंबाजोगाईत शहर ठाण्यात जाऊन मुद्देमालाचा पंचनामा केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार बोडखे, पोलीस कर्मचारी घोलप, तानाजी तागड यांनी पार पाडली. अन्न व औषधी प्रशासन म्हणजे वरातीमागून घोडे : जिल्ह्यात गुटख्याची सर्रासपाने विक्री होत असताना अन्न व औषधी प्रशासन विभाग मात्र त्याकडे डोळेझाक करत आहे. गुटखा पकडण्याची जबाबदारी मुख्यत्वे त्यांची असताना सुद्धा पोलिसांनाच ते काम करावे लागत आहे. पोलिसांनी गुटखा पकडल्यानंतर केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम या विभागाचे अधिकारी करतात. विविध हॉटेल, दुकाने या ठिकाणी जाऊन या विभागाच्या अधिकार्‍यांनी काही कारवाई केल्याच्या घटनाही मागील अनेक दिवसापासून पाहण्यात नाहीत. त्यामुळे या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नेमके करतात तरी काय हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.