Breaking News

घरगुती वादातून वडिलांनीच केला मुलाचा खून बॅनर

संगमनेर/प्रतिनिधी
 तालुक्यातील वडगावपान शिवारात घरगुती वादातून वडिलांनीच मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. अंकुश दत्तात्रय हुलवळे ( वय २८ ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खुनाच्या आरोपावरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात आरोपी दत्तात्रय हुलवळे कुटुंबीय राहते. वडील दत्तात्रय रामचंद्र हुलवळे ( वय ५५ ) यांना मुलगा अंकुश दत्तात्रय हुलवळे हा मशीन विकण्यास तसेच घरातील वस्‍तु विकण्यास नेहमी विरोध करीत होता. वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुले अंकुश हुलवळे व प्रविण हुलवळे यांच्या नावावर करण्यात आली होती. गायींचा चारा कापण्याचे मशीन विकण्यास अंकुश याने वडिलांना विरोध केला. याच रागातून सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी पिता दत्तात्रय रामचंद्र हुलवळे याने मुलगा अंकुश याचा दोरीने गळा आवळून खून केला. या घटनेप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मयत अंकुश हुलवळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होवून अंत्यसंस्कार झाल्यानंतर मयताचा भाऊ प्रविण दत्तात्रय हुलवळे यांनी वडिलांनी भावाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची फिर्याद दिली. सदर फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात आरोपी पिता दत्तात्रय रामचंद्र हुलवळे याच्याविरुद्ध मुलाच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहे.