Breaking News

बंधार्‍याच्या निकृष्ट कामाविरोधात भोसे ग्रामस्थांचे उपोषण

कर्जत/प्रतिनिधी
  कर्जत तालुक्यातील भोसे येथील जावली वस्तीमध्ये मंजूर झालेल्या बंधार्‍याचे काम निकृष्ट झाल्याच्या विरोधात उपोषण करण्यात आले. भोसे गावचे माजी सरपंच निळकंठ खराडे व पपन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भोसे गावातील ग्रामस्थ कर्जतच्या तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
 बंधार्‍याचे काम निकृष्ट झाल्याने यासंदर्भात ग्रामस्थांच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. अभियंता सी.एम.पवार यांनी जिल्हा स्तरीय पथक काम पाहण्यासाठी येतील, इस्टीमेंटप्रमाणेच काम करण्यात येईल असे लेखी आश्‍वासन देण्यात आले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके यांनी या प्रश्‍नावर मध्यस्थी केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणामध्ये माजी सरपंच निळकंठ खराडे, पपन क्षीरसागर, माजी उपसरपंच दत्तात्रय खराडे, बाबा खराडे, संदीप चव्हाण, नितीन चव्हाण, सुरेश विपट, किरण खराडे, लतीफ शेख, गणेश खराडे आदी उपोषणाला बसले होते.