Breaking News

पालिकेत पुन्हा ई-टेंडर घोटाळा

मुंबई
मुंबई महापालिकेत चार वर्षांनंतर पुन्हा ई-टेंडर घोटाळा समोर आला आहे. आयटी विभागातील भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने हा घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत केला. त्यामुळे पालिकेतील ई-टेंडरिंगवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.
मॅन्युअली पद्धतीने होणारे घोटाळे टाळण्यासाठी ई-टेंडर पद्धत सुरू करण्यात आली. मात्र घोटाळ्यात सरावलेल्या अधिकार्‍यांनी यातही चोरवाटा शोधून काढल्या आणि 2014-15 मध्ये 100 कोटींचा घोटाळा केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. मात्र घोटाळ्याचे सत्र अद्यापही सुरूच राहिल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
दुपारी 12 वाजता निविदाप्रक्रिया सुरू होते आणि सायंकाळी  4 वाजता बंद होते. या तीन तासांत 13 निविदाकारांपैकी फक्त दोघेच पात्र ठरतात. म्हणजे पालिकेतील आयटी विभागातील भ्रष्ट अधिकारी व कँत्राटदार यांचे संगनमत असून, हा महा टेंडर घोटाळा असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यांच्या आरोपाला पाठिंबा देत टेंडर घोटाळ्याचा फॉरेन्सिक अहवाल दाबण्याचे काम निवृत्त उपायुक्तांनी केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला.
मॅन्युअली टेंडर लीक होतात, म्हणून ई-टेंडरिंग प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य करत असले तरी त्याचा फॉरेन्सिक चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले. अहवाल आला असला, तरी कारवाई शून्य आहे. निवृत्त उपायुक्तांनी अहवाल दडपण्याचे काम केले असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेख यांनी केली. सदस्यांचे मुद्दे लक्षात घेऊन पुढच्या बैठकीत आयुक्तांनी लेखी उत्तरे द्यावीत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.