Breaking News

"संवाद" हरवला आहे.

साधारणपणे दोनहजार तीन/चार सालातील गोष्ट आहे.तेव्हा मी खूप विचार करुन मुला साठी पहिला मोबाईल घेतला.पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या जवळपासच्या एका मोबाईल शाँपीत तो घेतला.त्यावेळी मोबाईल घेणं म्हणजे खूपच आनंददायी गोष्ट होती.आपण मोबाईल घेतला  ही जाणीवही वेगळीच होती.आता वर्षा वर्षांनी मोबाईल बदलवणा-यांची संख्या पाहिली तर आश्चर्य वाटायला होते.
 त्या नंतरच्या काळात आमूलाग्र क्रांती घडून आली.."नजीकच्या काळात गुरे वळणाऱ्या  गुराख्या कडेही मोबाईल असेल".असे भाष्य अंबानींनी केले होते.आणि आज आपण बघतोय, ते सत्यात उतरलेय.जो गुराखी ट्रान्झिस्टर रेडिओ घेउन रानात जात होता आणी मनोरंजन करत होता,त्याच्याकडे आता मोबाईल आला आहे.खेड्यापाड्यावर कोणीतरी एखादे वर्तमानपत्र
आणले की ते आळीपाळीने वाचले जात होते.आता त्यांचे कडे मोबाईल आले.वर्तमानपत्राचे वाचन बंद पडले. खेड्यापाड्यात ज्या महिला कधी वर्तमानपत्र सुध्दा वाचत नव्हत्या, त्यांच्या हातात आता मोबाईल आले.कामवाल्या बाई कडे सुध्दा मोबाईल आला,त्याही अाता व्हाट्साप वर संवाद साधू लागल्यात.यु ट्यूब बघू लागल्या. टी.व्ही,यु.ट्युब वरच्या रेसीपी बघू लागल्या.आणी तसे पदार्थ बनवायला लागल्यात.व्हाँटसाप गृप तयार झाले.शेतकरी-शेतमजूरा जवळही मोबाईल आला.त्यांनाही शेती विषयी माहिती मिळू लागली.माहितीचे  खूप मोठे दालन सगळ्याना खुले झाले.हा खूप अनपेक्षित बदल घडून आला.एकप्रकारे तो चांगलाही म्हणावा लागेल.
काही वर्षापूर्वी रेल्वे -बस प्रवासात आपण सहज एखाद वर्तमानपत्र,  पुस्तक, बुकस्टाँल वरुन प्रवासात वाचायला  विकत घेत होतो. आता ते ही बंद झालयं.बहुतेक प्रवासी आप आपल्या मोबाईल बघण्यात मग्न असतात.नाही तर कानात हेडफोन लाऊन मोबाईल वर गाणे ऐकण्यात गुंग असतात.
शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनी, काँलेजीयन्स जवळ मोबाईल आले.रस्त्यांवरुन जाताना प्रत्येकाचे हातात मोबाईल असल्याचे चित्र दिसते.रोजच्या जगण्यात मोबाईल अविभाज्य अंग झाला. प्रत्येक ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर करणे आवश्यक झाले. थोडक्यात आता मोबाईल वापराविना कोणीही राहिले नाही,असे म्हणावे लागेल. ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
  एकीकडे ह्या माध्यमा मुळे जग जवळ आले,हवी ती माहिती गुगल वर मिळू लागली.माहितीचा खजिनाच मिळाला. असे असले तरी,खूप काही फायदे तसे अनेक दुष्परिणाम ही दिसून येऊ लागलेयत.तरुण मूल मुली आत्मकेन्द्री झाली दिसतात.  वाचन बंद झाल्या सारखे झाले.सतत मोबाईल मध्ये डोकाऊ लागली आहे.थोड्या थोड्या वेळाने व्हाट्सपचे अपडेट बघण्याचा, स्टेट्स,फेसबुक वरचे लाईक्स,काँमेंट,बघण्याचा  नादच लागलाय...त्यामुळे सततच्या मोबाईल वापराने अनेक आजार जडू लागलेय. मोबाईल मिळाला नाही म्हणून मुलानी आत्महत्या केल्याच्या घटनाही झाल्यात.अनिर्बंध मोबाईल वापरामुळे  विद्यार्थी वर्ग,तरुणाईच वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे.महाविद्यालयात समृद्ध वाचनालये आहे पण वाचकविद्यार्थी वर्ग पाहिजे तसा राहिला नाही. गावागावात वाचनालये आहेत,पण वाचकवर्ग कमी झालाय.ठराविक असा वाचकवर्ग आहे.काही प्रमाणात पुस्तकाची जागा ई-बुक्सनी घेतली अाहे. पण असा वर्ग मर्यादित आहे.घर बसल्या सर्वच कार्यक्रमांचा आनंद घेता येत असल्यामुळे साहित्यिक -सांस्कृतिक कार्यक्रमाची होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे.माणसां- माणसांतला संवाद कुठतरी हरवल्या  सारखा वाटतोय. घरा घरात प्रत्येका जवळ वेगळे मोबाईल आल्याने जो तो आपल्या मोबाईलच्या नादात असल्याचे चित्र घरा घरातून बघायला मिळतय. अगदी लहान लहान मुलंही मोबाईलच्या आहारी गेल्याचे दिसते.एखाद्या कार्यक्रमातही चार लोक एकत्र येतात त्यांच्यातही फार असा संवाद होत नाही कारण जो तो आपला मोबाईल बघण्यात मग्न असतो ही सत्यपरिस्थीती नाकारता येणार नाही.  घरात आई.वडिल.मुलांन मधला संवाद कमी झालाय. 
इंटरनेट,मोबाईल, लँपटाँप आदी मुळे वाचनसमृधीचा दावा केला जात असला तरी तो खूप मर्यादित असा आहे.जग जवळ आलय पण माणसां मणसातलां संवाद कमी झालाय.ह्याची जाणीव झाल्या वाचून रहात नाही.
आजच्या घडीला अनेक विषयावर नवनवीन पुस्तके, दरवर्षी खूपचांगले साहित्य घेऊन दिवाळी अंक बाजारात येतात. वाचकांसाठी अनेक सवलती जाहिर होतात,किती तरुण वर्ग त्याचा वाचक आहे?हा खूप महत्वाचा भाग आहे.वाचकांचा एक विशिष्ट वर्ग आहे तोच वाचतो.त्यात आमूलाग्र वाढ होणे काळची गरज आहे.
परवाच रस्त्याने जातांना  आठ-दहा  काँलेज तरूण-तरूणीं कट्यावर बसली होती.  प्रत्येकाचे हातात मोबाईल,मला त्यांच्याशी संवाद करावा वाटले म्हणून मी थांबलो.त्यांना वाटले मला काही अडचण आहे.त्यातला एक म्हणाला "काय,काही प्राँल्बेम आहे का ?मी त्यांना म्हणालो पाँब्लेम नाही "मला तुमच्याशी काही बोलायचं आहे" बोलू का? हो बोला नं! बोलतो पण खरं सांगाल? ते हो म्हणाले`.
माझा पहिला प्रश्न-तुम्ही अभ्यासाचे पुस्तका व्यतिरिक्त काही वाचन करता का?  जसे वर्तमानपत्र, काँलेजच्या वाचनालयातली काही ग्रंथ, मासिके,वगैरे. त्यावर त्यांच उत्तर -वेळच मिळत नाही. काय वाचणार.फेसबुक,व्हाटसाप वर आलेल वाचतो.मी त्यांना काही पुस्तकांची नाव सांगितली.  वाचली आहेत का?त्याच उत्तर नाहीच आलं.त्यातली एक मुलगी म्हणाली-मागच्या काही महिन्या पूर्वी एक पुस्तक वाचले होते.काँलेज मधून आणतो पुस्तके, पण वेळे अभावी न वाचताच मुदतीत परत करावे लागते.
माझ्याशी बोलतांना सगळ्यांचे लक्ष मात्र आपापल्या मोबाईल मध्ये मेसेज बघण्यात होते..ठिक आहे काका,तुम्ही सांगितलेले पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करु.थँन्कस् फाँर युवर अँडव्हाईस..मी तिथून निघालो. मला आमचा काळ आठवला.काँलेज मध्ये आम्ही ग्रंथपालाकडे पुस्तकांची मागणी करायचो.नसलेली पुस्तक मागवायला लावत होतो.आता सगळी समृद्धी असून ही परिस्थिती.
वाचनाने माणूस समृद्ध होतो,वाचनाचे अनेक फायदे आपण सगळेच एकमेकांना सांगत असतो... वाचाल तर वाचाल म्हणतो. ई-बुक्स वाचणारा वर्ग खूप कमी आहे. पेक्षा , प्रत्यक्ष नवकोरे पुस्तक हातात घेऊन वाचणे,किंवा  ताजे वर्तमानपत्र, हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. वेळीच मोबाईलचा मर्यादित वापर होणे अतिशय गरजेचे आहे.तरुणाई त्याच्या आहारी गेली आहे.वेळीच घरातील प्रत्येकांनी मोबाईल वापराची दिशा नक्की ठरवायला हवी आहे.काहीतरी निर्बध घालायला हवे आहे. तरच वाचन संस्कृती टिकून राहील.आणी माणसां माणसांतला  हरवलेला  संवाद परत स्थापित होईल.ही काळाची गरज आहे.

- दिलीप देशपांडे, 
जामनेर. जि.जळगांव  
मो.नं.९९६०३६५२०१