Breaking News

निळवंडेच्या कालवे खोदाईस सुरूवात

लाभक्षेत्रातील आवर्षण प्रवणभागात आनंदोत्सव 


अकोले/प्रतिनिधी
  निळवंडे धरणाच्या 0 ते 3 किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास 47 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सुरुवात झाली. त्यामुळे लाभक्षेत्रातील आवर्षण प्रवणभागात आनंदोत्सव साजरा झाला.
 मंगळवारी (दि.11) मंत्रालयात झालेल्या चर्चेनुसार निळवंडेचे कालवे प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बुधवारी पोलिस बंदोबस्तासह कालवे खोदण्यास सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत निळवंडेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पायथ्या-पासून ‘खोंडवस्ती ते तिटमेवस्तीपर्यंत’ तीन किलोमीटरपर्यंतचे कालवे खोदाईचे काम प्रगतीपथावर होते. शेतकर्‍यांनी आपआपल्या शेतातील भूईमूग, वालवडसारखी पिके काढून घेतली. ऊस कापून नेला आणि प्रशासनाला सहकार्य केले.
  शेतकर्‍यांचा जवळपास सर्व विरोध मावळल्याचे चित्र होते. गेली दोन, चार दिवस निळवंडे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. राखीव दलाचे 100 जवान तसेच स्थानिक पोलिस बुधवारपर्यंत होते. मुंबई येथे मंगळवारी अकोलेतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली.
 यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड, आ. वैभव पिचड, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, कैलास वाकचौरे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे समजते.
बुधवारी पाटबंधारे-जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी दोन पोकलेन, चार टिपर, डंपर, जेसीबी आदींसह कालवे खोदाईच्या कामाला गती दिली. कृषी विभागाचे अधिकारी एल. एन. नवले व त्यांच्या सहकार्‍यांनी शेतात उभ्या असलेल्या पिकांचे पंचनामे केले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, कार्यकारी अभियंता भरत शिंगाडे, उपअभियंता मनोज डोके, रोहित कोरे, तहसीलदार मुकेश कांबळे व पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख दिवसभर निळवंडे धरण परिसरात थांबून होते.