Breaking News

कुलभूषण जाधव प्रकरणी 17 जुलैला निर्णय ?

नवी दिल्ली
हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानमध्ये कैद असणार्‍या कुलभूषण जाधव प्रकरणाचा निर्णय लवकरच होणार आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली असून 17 जुलैला यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो. कुलभूषण हे पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली आहे. भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी साधव यांच्यावर पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाचा ठपका ठेवत एप्रिल 2017 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.  पाकिस्तानच्या ’हास्यास्पद कारवाई’ला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी निर्णय येईपर्यंत पाकिस्तानच्या न्यायालयाचा निर्णय राखून ठेवण्याचे आयसीजेने सांगितले. 17 जुलैला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता एक सार्वजनिक बैठक होई. यामध्ये न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अब्दुलकावी अहमद यूसुफ आपला निर्णय सुनावतील. आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीमध्ये यासंदर्भात चार दिवसांची सुनावणी झाली होती. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांनीही आपली बाजू मांडली होती.