Breaking News

डेबीट कार्डची तक्रार पडली महागात ; तरुणाला 27 हजार रूपयांचा गंडा

मुंबई
डेबीट कार्डच्या तांत्रिक बिघाडाबाबत तक्रारीचा पाठपुरावा करणे खासगी आरोग्य विमा कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत तरुणाला महागात पडले. या तरुणाला ऑनलाईन भामट्यांनी 27 हजार रुपयांचा गंडा घातला. प्रत्यक्षात या तरुणाने वरळी येथील बँक शाखेचा संपर्क क्रमांक मिळवण्यसाठी गुगलचा आधार घेतला. गुगलने जो संपर्क क्रमांक पुरवला तो बँकेचा नसून भामट्यांचा होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
सागर पाटील असे तक्रारदाराचे नाव असून ते वरळी येथील पोलीस वसाहतीत राहतात. त्यांचे बँक ऑफ इंडियाच्या वरळी शाखेत खाते आहे. त्यांच्या डेबीट कार्डची मुदत(व्हॅलीडीटी) 2024पर्यंत आहे. सहा महिन्यांपासून या डेबीट कार्डाद्वारे व्यवहार होत नव्हते म्हणून पाटील सोमवारी वरळी शाखेत तक्रार देण्यासाठी गेले. तेथे त्यांना बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार देण्याची सूचना केली गेली. त्यानुसार त्यांनी तक्रार दिली. गुरूवारी त्यांनी तक्रारीचा पाठपुरावा करावा या विचाराने वरळी शाखेचा संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी गुगलचा आधार घेतला.
गुगलवर जो क्रमांक मिळवला त्यावर त्यांनी संपर्क साधला. समोच्या व्यक्तीने वरळी शाखेतून बोलतो, असे सांगितले. तक्रारीचा विषय काढताच या व्यक्तीने पाटील यांच्या बँक खात्यासह डेबीट कार्डांचे तपशील मागितले. विश्‍वाास बसल्याने पाटील यांनी सर्व तपशील या व्यक्तीला दिले. थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून सहा व्यवहार झाले आणि 27हजार रुपये परस्पर काढण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.