Breaking News

भंडारदरा 30 टक्के भरले

अहमदनगर/प्रतिनिधी
 भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरण 30 टक्के भरले. मंगळवारी दिवसभर पाणलोटात पावसाच्या सरीवर सरी सुरूच होत्या. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत धरणाच्या पाण्याची पातळी वाढून साडेतीन हजार दशलक्ष घनफूटाच्या पुढे जाईल.
  प्रवरा व कृष्णावती नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या निळवंडे धरणाचा पाणीसाठा आता गतीने वाढण्यास मदत होणार आहे. पाणलोट क्षेत्रातील कृष्णावती नदीवर असलेला 112.66 द.ल.घ.फूट क्षमतेचा वाकी लघू पाटबंधारे प्रकल्प रविवारी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी 556 क्युसेक वेगाने प्रवरा नदीत वहात होते. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच पाणी प्रवरा नदीतून निळवंडे धरणात जमा होते. मात्र, आता वाकी जलाशय पूर्ण भरल्यामुळे निळवंडे धरणात नवीन पाणी गतीने येण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता निळवंडे धरणाचा पाणीसाठा 947 दलघफू झाला आहे. बुधवारी तो 1 हजार दलघफूचा टप्पा पूर्ण करेल. अकोले तालुक्याचे हरिश्‍चंद्रगड, पाचनई, अंबीत, शिरपुंजे, खडकी, लव्हाळी आदी आदिवासी भागातून सध्या पावसाचा जोर कायम आहे. मुळा नदीचा प्रवाह मुळा धरणाकडे 5 हजार 638 क्युसेकने सुरू आहे. शिरपुंजे, बलठण आणि वाकी जलाशय तुडुंब झाले असून मुळा नदी दुथडी भरून वहात आहे.